रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | रावेर तालुक्यातील अंत्योदय रेशन कार्डधारक कुटुंबांना तब्बल दोन वर्षांनंतर मोठा दिलासा मिळणार आहे. यंदा रावेर धान्य गोडाऊनवर रेशनकार्डावर वाटपासाठी साखर प्राप्त झाली असून, त्यामुळे गरीब कुटुंबांमधून समाधान व्यक्त होत आहे. सदर साखरेचे वाटप चालू महिन्यात करण्यात येणार असल्याची माहिती पुरवठा विभागाने दिली आहे.
रावेर तालुका मध्य प्रदेश सीमेवर असल्याने यापूर्वी धान्य व साखरेचा काळाबाजार झाल्याचे प्रकार उघडकीस आले होते. त्यामुळे गोडाऊनवर प्राप्त झालेली साखर अंतिम लाभार्थ्यांपर्यंत पोहोचेपर्यंत संपूर्ण प्रक्रियेवर पत्रकारांचे लक्ष राहणार आहे.

मार्च 2024 नंतर प्रथमच या महिन्यात रावेर व सावदा गोडाऊनवर साखर दाखल झाली आहे. रावेर तालुक्यातील एकूण 10 हजार 640 अंत्योदय कार्डधारकांसाठी 475 क्विंटल साखर प्राप्त झाली असून, अजून 155 क्विंटल साखर येणे बाकी आहे.सदर साखर ही शासनाकडून नोव्हेंबर-डिसेंबर 2025 तसेच जानेवारी, फेब्रुवारी, मार्च व एप्रिल महिन्यांच्या वाटपासाठी असल्याची माहिती पुरवठा निरीक्षण अधिकारी विवेक शिलेकर यांनी दिली. ही साखर पूर्णपणे ईमानदारीने गरीब कुटुंबांपर्यंत पोहोचावी, हीच जनतेची माफक अपेक्षा आहे.
अखेर गोडाऊनमधून निकृष्ट ज्वारीची उचल
रावेर धान्य गोडाऊनवर आलेल्या निकृष्ट दर्जाच्या ज्वारीबाबत लाईव्ह ट्रेंड्स न्यूजने वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत आमदार अमोल जावळे यांनी जिल्हा प्रशासनाला, “एकही दाणा गरीब कुटुंबांना देऊ नका”, अशा स्पष्ट सूचना दिल्या होत्या.अखेर जिल्हा प्रशासनाने संबंधित निकृष्ट ज्वारीची उचल सुरू केली असून, त्याऐवजी चांगल्या दर्जाची ज्वारी आणली जात असल्याची माहिती पुरवठा अधिकारी शिलेकर यांनी दिली आहे.



