Home Cities जळगाव प्रभाग १३ मधील प्रश्नांवर नगरसेविका वैशाली पाटील यांचे निवेदन 

प्रभाग १३ मधील प्रश्नांवर नगरसेविका वैशाली पाटील यांचे निवेदन 


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहर महानगरपालिकेत नव्या महापौर म्हणून दीपमाला काळे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी शहरातील विविध प्रभागांतील प्रश्न पुढे येऊ लागले असून, प्रभाग क्रमांक १३ मधील नगरसेविका वैशाली अमित पाटील यांनी थेट महापौरांकडे निवेदन सादर करून प्रभागातील मूलभूत समस्यांकडे लक्ष वेधले आहे. प्रशासक राजवटीमुळे रखडलेल्या कामांना आता गती मिळावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

नगरसेविका वैशाली पाटील यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, गेल्या काही दिवसांपासून महानगरपालिकेवर प्रशासक असल्यानंतर प्रभागातील नागरिकांना दैनंदिन जीवनाशी संबंधित अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विशेषतः स्वच्छतेच्या प्रश्नांमुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढली असून घंटागाडी, सफाई व इतर संबंधित कामांमध्ये मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत.

प्रभाग क्रमांक १३ मध्ये सफाई कर्मचाऱ्यांची कमतरता, घंटागाडींसाठी वाहनांची अपूर्तता, तसेच नियमित स्वच्छतेचा अभाव अशा समस्या गंभीर स्वरूपाच्या असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. यासोबतच प्रभागातील नवीन विकासकामे जसे की रस्ते, गटारी, ओपन स्पेसचे विकासकाम, सुशोभिकरण आणि इतर गरजेची कामे रखडलेली असून ती तातडीने सुरू होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले आहे.

याशिवाय, मागील काही काळात मंजूर झालेल्या कामांच्या अंमलबजावणीदरम्यान येणाऱ्या अडचणी, तसेच नवीन कामे सुचवताना निर्माण होणाऱ्या प्रशासकीय अडथळ्यांबाबत सविस्तर चर्चा होणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. या सर्व बाबींवर तोडगा काढण्यासाठी महापौर, आयुक्त, प्रभागातील नगरसेवक नितीन प्रभाकर सपके, सौ. सुरेखा नितीन तायडे, प्रफुल्ल गुलाबराव देवकर तसेच संबंधित महानगरपालिकेचे अधिकारी व मक्तेदार यांच्या उपस्थितीत लवकरात लवकर संयुक्त बैठक आयोजित करण्याची मागणी करण्यात आली आहे.

या बैठकीत योग्य त्या सूचना देऊन प्रत्यक्ष कामांना सुरुवात झाल्यास प्रभाग क्रमांक १३ मधील विकासकामांना गती मिळेल आणि नागरिकांच्या समस्या सुटण्यास मदत होईल, असा विश्वास नगरसेविका वैशाली पाटील यांनी व्यक्त केला आहे. नव्या महापौरांच्या नेतृत्वाखाली शहरातील रखडलेले प्रश्न मार्गी लागतील, अशी अपेक्षा प्रभागातील नागरिकांकडूनही व्यक्त होत आहे.


Protected Content

Play sound