
अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील पिळोदे गावात बुधवारी एका पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याने दोन लहान मुलांवर भीषण हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या हल्ल्यात ८ वर्षांची चिमुकली गंभीर जखमी झाली असून तिच्यावर धुळे येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले असून ग्रामपंचायतीने संबंधित कुत्र्याला पकडणाऱ्यास बक्षीस जाहीर केले आहे.

मिळालेली माहिती अशी की, मृणाली दिनेश कोळी (वय ८ वर्षे) ही चिमुकली सध्या सुट्ट्यांसाठी पिळोदे येथे आपल्या मामाच्या गावी आली होती. बुधवारी ४ फेब्रुवारी रोजी दुपारी ती घराजवळ खेळत असताना, अचानक एका भटक्या कुत्र्याने तिच्यावर झडप घातली. या कुत्र्याने मृणालीच्या गालावर आणि डोक्यावर अत्यंत गंभीरपणे चावा घेतला. मुलीचा आरडाओरडा ऐकून स्थानिक नागरिक धावून आले, तोपर्यंत ती रक्ताच्या थारोळ्यात पडली होती.
त्याच दरम्यान, याच कुत्र्याने गावातील दुसऱ्या एका लहान मुलावरही हल्ला करून त्याला जखमी केले. लागोपाठ झालेल्या दोन हल्ल्यांमुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पिसाळलेल्या कुत्र्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिळोदे गावाच्या ग्रामसेवकांनी तातडीने पावले उचलली असून, या कुत्र्याला पकडून देणाऱ्या व्यक्तीस ११०० रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे.
गंभीर जखमी झालेल्या मृणालीला तातडीने स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले, मात्र जखमा खोल असल्याने तिला पुढील उपचारासाठी धुळे येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सद्यस्थितीत तिची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. अमळनेर तालुक्यात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर होत असून, प्रशासनाने यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी पिळोदे येथील नागरिकांनी केली आहे.



