
फैजपूर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । फैजपूर नगरपालिकेची सर्वसाधारण सभा आज दि. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडली. या सभेला नगराध्यक्षा दामिनी सराफ, मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांच्यासह सहा नगरसेवक व दोन स्वीकृत नगरसेवक उपस्थित होते. मात्र, एकूण १३ नगरसेवक गैरहजर राहिल्याने शहरात विविध चर्चांना उधाण आले आहे.

सभेला उपनगराध्यक्ष निकिता कोळी, भाजपचे गटनेते सिद्धेश्वर वाघुळदे यांच्यासह अनेक नगरसेवक अनुपस्थित राहिल्याचे दिसून आले. इतक्या मोठ्या संख्येने लोकप्रतिनिधी गैरहजर राहिल्याने सभेतील चर्चांबाबत आणि निर्णयांबाबत नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. काहींनी या अनुपस्थितीमागे राजकीय कारणे असावीत का, असा सवाल उपस्थित केला आहे.
यासंदर्भात मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी स्पष्ट केले की, सदर सभा कायदेशीर प्रक्रियेप्रमाणे पार पडली असून आवश्यक कोरम पूर्ण झाला होता. सभेत मांडण्यात आलेले सर्व विषय मंजूर करण्यात आले असून प्रशासकीय कामकाजावर त्याचा कोणताही परिणाम होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, अनेक नगरसेवकांच्या अनुपस्थितीमागील नेमकी कारणे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत. शहरातील नागरिक आणि राजकीय वर्तुळात या विषयावर उत्सुकता वाढली असून आगामी बैठकीत याबाबत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. फैजपूरच्या स्थानिक राजकारणात या घटनेची चर्चा रंगू लागली असून पुढील सभांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



