
शेंदुर्णी-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शेंदुर्णी नगरपंचायतीच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत शहरात नवीन बियरबार आणि वाईन शॉपसाठी नाहरकत दाखले देण्याच्या निर्णयाची चर्चा समोर आल्यानंतर शहरातील महिला व नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या निर्णयाविरोधात स्वशक्ति व्यसनमुक्ती समितीतर्फे उद्या ६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता नगरपंचायत कार्यालयावर महिला मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

या संदर्भात समितीच्या वतीने ४ फेब्रुवारी रोजी शेंदुर्णी पोलिस दुरक्षेत्राचे पोलिस उपनिरीक्षक यांना लेखी निवेदन देण्यात आले असल्याची माहिती सुनील गुजर यांनी दिली. नगरपंचायत निवडणूक २०२५ नंतर नव्याने निवडून आलेल्या सदस्यांची पहिली सर्वसाधारण सभा ३० जानेवारी २०२६ रोजी लोकनियुक्त नगराध्यक्ष गोविंद अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. मुख्याधिकारी विवेक धांडे, सर्व नगरसेवक व नगरसेविका उपस्थित असताना आयत्या वेळच्या विषयावर चर्चा करत शहरात नवीन बियरबार व वाईन शॉप सुरू करण्यासाठी नाहरकत दाखले देण्यास मंजुरी देण्यात आल्याची शहरात चर्चा रंगली आहे. मात्र या निर्णयाचे अधिकृत इतिवृत्त अद्याप नोंदवले गेले नसल्याचे समजते.
शहरातील महिलांचे म्हणणे आहे की, शेंदुर्णीला धार्मिक पर्यटन क्षेत्राचा दर्जा आहे तसेच शिक्षणाचे केंद्र म्हणून जिल्ह्यात ओळख आहे. अशा शहरात मद्यविक्री केंद्रांची संख्या वाढवणे समाजहिताला घातक ठरेल. सध्या शहरात तीन बियरबार व एक देशी दारू विक्री दुकान मध्यवस्तीत सुरू असून त्यांनाही शहर हद्दीबाहेर स्थलांतरित करण्याची मागणी यापूर्वीच करण्यात आली होती. अशा परिस्थितीत नवीन परवानग्या देण्याचा निर्णय हा नागरिकांच्या भावनांचा अवमान असल्याचे आंदोलकांचे मत आहे.
गेल्या २५ वर्षांत अनेकांनी बियरबार व वाईन शॉपसाठी नाहरकत दाखल्यांची मागणी केली होती, मात्र तत्कालीन महिला सरपंच व नगराध्यक्ष सौ. विजया खलसे यांनी सामाजिक परिणाम लक्षात घेऊन अशा परवानग्या नाकारल्या होत्या, अशीही चर्चा नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे नव्या निर्णयामुळे शहराच्या सांस्कृतिक वातावरणावर परिणाम होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
स्वशक्ति व्यसनमुक्ती समिती तसेच जागरूक नागरिक मंचाने या निर्णयाचा निषेध करत महिलांनी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. मोर्चादरम्यान निवेदन देऊन नगरपंचायतीने हा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.



