Home न्याय-निवाडा लाईव्ह ट्रेंड्स न्यूज इफेक्ट : अखेर उमरदा फाट्याच्या अंडरपासला मंजुरी

लाईव्ह ट्रेंड्स न्यूज इफेक्ट : अखेर उमरदा फाट्याच्या अंडरपासला मंजुरी


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । लोहारखेडा आणि पिंप्रीभोजना येथील शेतकऱ्यांनी प्रलंबित अंडरपासच्या मागणीसाठी तीव्र आंदोलन करीत जलसमाधी घेण्याचा इशारा दिला होता. न्हाई प्रशासनाने अखेर दखल घेत उमरदा फाटा येथे भुयारी मार्ग (अंडरपास) मंजूर केल्याचे पत्र तहसीलदारांना प्राप्त झाले आहे. या निर्णयामुळे संतप्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून परिसरात समाधान व्यक्त होत आहे.

२ फेब्रुवारी रोजी इंदूर–हैदराबाद महामार्गावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन करत आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. शेतीची जमीन दोन्ही बाजूंनी विभागली गेल्याने तसेच महामार्ग ओलांडताना वारंवार अपघाताच्या घटना घडत असल्याने अंडरपासची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी जलसमाधीचा इशाराही दिला होता. या आंदोलनाचे वृत्त लाईव्ह ट्रेंड्स न्यूजवर प्रसिद्ध झाल्यानंतर विषयाला अधिक गांभीर्य प्राप्त झाले.

शेतकऱ्यांचे म्हणणे होते की, पिकांची वाहतूक, जनावरांची ने-आण तसेच शेतमजुरांची हालचाल करताना महामार्ग ओलांडणे धोकादायक ठरत आहे. अनेक वेळा अपघाताच्या घटना घडल्या असून जीवितहानी टळली असली तरी भीतीचे वातावरण कायम आहे. त्यामुळे सुरक्षित भुयारी मार्ग उभारणे ही अत्यावश्यक गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.

प्रशासनाकडून आलेल्या पत्रानुसार उमरदा फाटा येथे अंडरपास मंजूर करण्यात आला असून पुढील तांत्रिक प्रक्रिया आणि कामाच्या आराखड्याबाबत हालचाली सुरू होणार आहेत. या निर्णयामुळे परिसरातील शेतकऱ्यांना शेतीकामात मोठी सोय होणार असून वाहतुकीतील धोके कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांनी या निर्णयाचे स्वागत केले असून आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल प्रशासनाचे आभार मानले आहेत. तसेच मंजूर काम लवकरात लवकर प्रत्यक्षात सुरू करून पूर्ण करण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.


Protected Content

Play sound