
मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । राज्यातील राजकीय आणि प्रशासकीय घडामोडींना वेग आला असून उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवार यांच्याकडे पुणे आणि बीड या दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद सोपवण्यात आले आहे. सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भात अधिकृत परिपत्रक जारी केल्याने या नियुक्तीवर शिक्कामोर्तब झाले आहे.

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर चौथ्या दिवशी राजभवन येथे सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शपथविधीच्या वेळेबाबत राजकीय वर्तुळात चर्चा आणि टीका झाली असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले. पवार कुटुंबाने तिसऱ्याच दिवशी दशक्रिया विधी पूर्ण केल्याने चौथ्या दिवशी शपथविधी घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर अर्थ खाते वगळता अजित पवारांकडे असलेली उर्वरित सर्व खाती सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात आली आहेत. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांच्याकडे दिली जाणार असल्याचे संकेत प्रफुल पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिले. त्यामुळे प्रशासकीय तसेच संघटनात्मक पातळीवर सुनेत्रा पवार यांची भूमिका अधिक महत्त्वाची ठरणार आहे.
पुणे आणि बीड जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाबाबत सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला असून शासनाने अधिकृत परिपत्रक काढत ही जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडेच असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, 9 फेब्रुवारी रोजी त्या मंत्रालयीन कार्यालयात हजर राहणार असल्याची माहितीही समोर आली आहे. याआधी अजित पवार मंत्रालयातून राज्यभरातील कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करत होते, अशी भावना पक्षातील नेत्यांकडून व्यक्त होत आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीसह बीड जिल्ह्यातही बंद पाळण्यात आला होता. बारामतीचे सुपुत्र म्हणून अजित पवार यांच्याविषयी बारामतीकरांनी आपुलकी व्यक्त केली, तर बीड जिल्ह्यात पालकमंत्री म्हणून त्यांनी अल्पावधीतच जनतेशी घट्ट नाते निर्माण केले होते. त्यामुळे बीडमधील नागरिकांनीही बंद पाळत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
दरम्यान, बीडमध्ये संतोष देशमुख हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याच्याशी निकटचे संबंध असल्याच्या आरोपांमुळे मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर बीडच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी अजित पवार यांच्याकडे देण्यात आली होती. आता त्यांच्या पश्चात ही जबाबदारी सुनेत्रा पवार सांभाळणार असल्याने बीडच्या राजकीय व प्रशासकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.



