Home न्याय-निवाडा हायकोर्टाच्या आदेशानंतर संतोषी माता बहुद्देशीय सभागृह प्रशासनाच्या ताब्यात 

हायकोर्टाच्या आदेशानंतर संतोषी माता बहुद्देशीय सभागृह प्रशासनाच्या ताब्यात 


भुसावळ – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील प्रोफेसर कॉलनी परिसरात असलेल्या संतोषी माता बहुद्देशीय सभागृहाच्या वापरासंदर्भात सुरू असलेल्या वादाला अखेर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशामुळे निर्णायक वळण मिळाले आहे. शासनाची आवश्यक मान्यता नसताना सदर सभागृह नगरपालिकेकडून शैक्षणिक उद्देशासाठी वापरास देण्यात आल्याचा मुद्दा न्यायालयात गेला होता. या प्रकरणी उच्च न्यायालयाने स्पष्ट आदेश देत सभागृहाचा विद्यमान ताबा काढून तो भुसावळ नगरपालिकेकडे सुपूर्द करण्याचे निर्देश दिले होते.

या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी जळगाव जिल्हाधिकारी यांनी भुसावळचे उपविभागीय अधिकारी यांना योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आज प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन उपविभागीय अधिकारी, भुसावळ यांनी संतोषी माता बहुद्देशीय सभागृह ताब्यात घेतले. या कारवाईदरम्यान सोमवारी सायंकाळी चार वाजता प्रांत अधिकारी जितेंद्र पाटील यांच्यासह भुसावळ नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. संपूर्ण प्रक्रिया शांततेत आणि नियमानुसार पार पडल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

नगरपालिकेकडून शासन मान्यता नसताना सभागृहाचा वापर शैक्षणिक कारणांसाठी करण्यात आल्याने मूळ उद्देश आणि जागेच्या हस्तांतरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. याच पार्श्वभूमीवर दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना औरंगाबाद खंडपीठाने सदर जागा पुन्हा नगरपालिकेच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आल्याने प्रशासनाच्या भूमिकेचे सर्वत्र स्वागत होत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ताब्यात घेतलेले हे सभागृह येत्या काही दिवसांत औपचारिकरीत्या भुसावळ नगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया याच आठवड्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, उद्याच्या दिवशी भुसावळ नगरपालिकेची सर्वसाधारण सभा होत असून या सभेत या विषयावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे भुसावळकरांचे विशेष लक्ष लागून राहिले आहे.


Protected Content

Play sound