रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । निमड्या वनक्षेत्रात वन्यप्राण्यांची बेकायदेशीर शिकार करणाऱ्या टोळीवर वनविभागाने धडक कारवाई करत सहा जणांना बंदुकीसह अटक केल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या कारवाईमुळे वन्यप्राणी तस्करांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन्यजीवप्रेमी व निसर्गसंरक्षकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
निमड्या वनक्षेत्रातील कक्ष क्रमांक ५२ मध्ये काही शिकारी शस्त्रांसह येणार असल्याची गुप्त माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी शीतल नगराळे यांना मिळाली होती. या विश्वासार्ह माहितीच्या आधारे नगराळे यांनी तातडीने आपल्या पथकासह रणनीती आखून निमड्या परिसरात सापळा रचला. संशयित हालचाली दिसताच वनविभागाच्या पथकाने छापा टाकत कारवाई केली.

या कारवाईत सुनिल भिल्या पावरा, अर्जुन खुमसिंग पावरा, नवलसिंग सखाराम पावरा, लालू लखरा पावरा, श्रीराम खुमसिंग बारेला आणि राजाराम हाड्या पावरा (सर्व रा. निमड्या) या सहा आरोपींना ताब्यात घेण्यात आले. आरोपींकडून एक बंदूक तसेच वन्यप्राण्यांचे मांस जप्त करण्यात आले असून पुढील चौकशी सुरू आहे. वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
ही संपूर्ण कारवाई वन संरक्षक (वन्यजीव) श्री. रामगावकर, उपवन संरक्षक कृष्णा भवर व सह वन संरक्षक सत्यजित निकत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वनपरिक्षेत्र अधिकारी शीतल नगराळे यांच्या नेतृत्वाखालील पथकात रजनी घोडके, संभाजी सूर्यवंशी, जनदिश बारेला, रियाज तडवी, शालिग्राम राठोड, जगदीश चव्हाण, आदिल शेख, बबलू खान व बाळू भोई यांचा समावेश होता.
वन्यजीवांच्या संरक्षणासाठी वनविभागाने सुरू केलेल्या सततच्या गस्त आणि गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या कारवायांमुळे अशा शिकारी प्रवृत्तींना आळा बसण्यास मदत होणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. भविष्यातही वन्यप्राण्यांच्या सुरक्षेसाठी अशाच कठोर कारवाया सुरू राहतील, असा इशारा वनविभागाकडून देण्यात आला आहे.



