
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सर्वपक्षीय व सर्वस्तरीय श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. राजकीय मतभेद बाजूला ठेवत विविध पक्षांचे नेते, प्रशासकीय अधिकारी, उद्योजक आणि सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने नाट्यगृह परिसरात शोकाकुल वातावरण निर्माण झाले होते.

या श्रद्धांजली सभेला जिल्हाधिकारी रोहन घुगे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, उद्योगपती अशोक जैन, केड्राई महाराष्ट्राचे राज्य उपाध्यक्ष अनिश भाई शहा, आमदार अनिलदादा पाटील, आमदार राजू मामा भोळे यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. याशिवाय करीम सालार, संजय पवार, विष्णू भंगाळे, व्ही. डी. पाटील, पणन महासंघाचे रोहित निकम यांच्यासह विविध क्षेत्रांतील प्रतिनिधी आणि जळगावकर नागरिक मोठ्या संख्येने सभेत सहभागी झाले होते.
सभेदरम्यान वक्त्यांनी अजितदादा पवार यांच्या राजकीय वाटचालीचा, प्रशासकीय निर्णयक्षमतेचा आणि विकासाभिमुख दृष्टिकोनाचा उल्लेख केला. सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नांशी असलेली त्यांची बांधिलकी, कार्यकर्त्यांना दिलेले बळ आणि राज्याच्या विकासासाठी घेतलेले ठोस निर्णय यामुळे त्यांनी जनमानसात वेगळे स्थान निर्माण केले, असे मत अनेकांनी व्यक्त केले. त्यांच्या स्पष्टवक्तेपणा आणि कामातील तत्परतेच्या आठवणींना उजाळा देताना उपस्थितांचे डोळे पाणावलेले दिसून आले.
श्रद्धांजली सभेत दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून दिवंगत नेत्यास आदरांजली अर्पण करण्यात आली. विविध सामाजिक, औद्योगिक आणि राजकीय क्षेत्रातील उपस्थितांनी अजितदादा पवार यांचे कार्य पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, अशी भावना व्यक्त केली. या सभेमुळे जळगाव जिल्ह्यातील सर्व स्तरांतील लोकांच्या मनात असलेला शोक आणि आदर एकत्रितपणे व्यक्त झाला.



