मुंबई-वृत्तसेवा | अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात वेगवान घडामोडी सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट करत एनडीएसोबतची साथ कायम राहणार असल्याचे ठामपणे सांगितले. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गट पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले असतानाच तटकरे यांच्या या वक्तव्याला राजकीय वर्तुळात महत्त्व प्राप्त झाले आहे.
पत्रकारांशी संवाद साधताना तटकरे म्हणाले की, “आमची भूमिका पूर्णपणे स्वच्छ आहे. आम्ही दादांच्या परिवाराशी आणि त्यांनी उभा केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवाराशी सुसंगत असा निर्णय घेत आहोत. पक्षाचा विधिमंडळ नेता कोण असेल, हा निर्णय घेण्याचा अधिकार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच आहे.”

विलीनीकरणाच्या चर्चांबाबत बोलताना त्यांनी पुन्हा एकदा एनडीएशी असलेली बांधिलकी अधोरेखित केली. “विलीनीकरणाच्या संदर्भात मी अनेकवेळा स्पष्ट भूमिका मांडली आहे. आम्ही एनडीएसोबत आहोत आणि कायम राहणार आहोत. दादा असतानाही मी हेच वक्तव्य केले होते. ही भूमिका सर्वज्ञात आहे,” असेही तटकरे यांनी नमूद केले.
दरम्यान, अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या राजकीय पोकळीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढील नेतृत्वाबाबत आणि दोन्ही गटांच्या संभाव्य एकत्रीकरणाबाबत तर्कवितर्क सुरू असताना तटकरे यांच्या या विधानामुळे सध्यातरी विलीनीकरणाच्या चर्चांना विराम मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.



