Home Cities पारोळा पारोळ्यात सर्वपक्षीय शोकसभा ; विकासाला प्राधान्य देणारा परखड नेता हरपल्याची भावना

पारोळ्यात सर्वपक्षीय शोकसभा ; विकासाला प्राधान्य देणारा परखड नेता हरपल्याची भावना


पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाच्या पार्श्वभूमीवर पारोळा शहरात शनिवारी सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले. शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात पार पडलेल्या या सभेत राजकीय मतभेद विसरून सर्व स्तरांतील नागरिक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्र आले होते. राज्याने विकासाला प्राधान्य देणारा, परखड आणि कर्तबगार नेता गमावल्याची तीव्र भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

या शोकसभेला नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील, उपनगराध्यक्ष रोहन मोरे, माजी सभापती बाळासाहेब पवार यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. अजितदादा पवार हे कार्यकर्त्यांच्या कामाची तात्काळ दखल घेणारे, सर्वसामान्य जनतेला वेळ देणारे आणि राज्याच्या विकासासाठी झपाटलेले नेतृत्व होते, असे वक्त्यांनी नमूद केले. त्यांच्या स्पष्ट आणि परखड वक्तृत्वामुळे ते जनतेमध्ये वेगळे स्थान निर्माण करू शकले, असे मतही यावेळी व्यक्त झाले.

नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, अजितदादा पवार यांच्या अकस्मात अपघाती निधनाने राज्याचे मोठे नुकसान झाले असून ही पोकळी भरून न निघणारी आहे. त्यांनी घेतलेले निर्णय आणि विकासाभिमुख दृष्टिकोन राज्याच्या वाटचालीसाठी दिशादर्शक होते. उपनगराध्यक्ष रोहन मोरे यांनी सतत मार्गदर्शन करणारा आणि विकासाला सर्वोच्च प्राधान्य देणारा नेता आपण गमावला असल्याची खंत व्यक्त केली.

बाजार समितीचे संचालक मनोराज पाटील यांनी अजितदादा पवार यांच्यासारखा नेता पुन्हा होणे कठीण असल्याचे सांगितले, तर माजी नगराध्यक्ष सुरेंद्र बोहरा यांनी अजित पवार यांची ओळख स्पष्टवक्ता आणि ठाम भूमिका घेणारा नेता अशी असल्याचे मत मांडले. यावेळी डॉ. शांताराम पाटील, पी. जी. पाटील, दीपक भावसार, दिगंबर पाटील, बाळू पाटील यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनीही आपल्या भाषणांतून अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला.

सभेचे सूत्रसंचालन प्रा. आर. बी. पाटील यांनी केले. शोकसभेस नगरसेवक अमोल शिरोडे, नरेंद्र राजपूत, छोटू पाटील, मनीष पाटील यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.


Protected Content

Play sound