जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । वाहतूक सुरक्षा सप्ताह 2026 च्या निमित्ताने जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वाहतूक शाखेतर्फे शहरात हेल्मेट वापराबाबत जनजागृती करण्यासाठी भव्य मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. दुचाकी अपघातांमध्ये होणारी जीवितहानी कमी करण्यासाठी नागरिकांमध्ये सुरक्षिततेची जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने ही रॅली काढण्यात आली असून नागरिकांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
ही जनजागृती मोटरसायकल रॅली पोलीस मुख्यालय, जळगाव येथून दुपारी चार वाजता जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी हिरवी झेंडी दाखवून सुरू केली. रॅलीच्या उद्घाटनप्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, पोलीस उपविभागीय अधिकारी नितीन गणापुरे, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक पवन देसले, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर शिंपी, शनिपेठ पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्यासह महिला व पुरुष पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रॅली पोलीस मुख्यालयातून सुरू होऊन स्वातंत्र्य चौक, काव्यरत्नावली चौक, गाडगेबाबा चौक यांसह शहरातील प्रमुख चौकांमधून मार्गक्रमण करत पुन्हा पोलीस मुख्यालय येथे येऊन संपन्न झाली. रॅलीदरम्यान सहभागी सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हेल्मेटचा वापर करून “हेल्मेट घाला, जीव वाचवा”, “वाहतूक नियम पाळा” अशा संदेशांचे फलक हातात घेऊन नागरिकांपर्यंत वाहतूक सुरक्षेचा प्रभावी संदेश पोहोचवला.
यावेळी बोलताना उपस्थित अधिकाऱ्यांनी सांगितले की, दुचाकी अपघातांमध्ये डोक्याला होणाऱ्या गंभीर दुखापतीमुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी होते. हेल्मेटचा नियमित वापर केल्यास अशा अपघातांमध्ये मृत्यूचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होऊ शकते. त्यामुळे प्रत्येक दुचाकीस्वाराने स्वतःच्या तसेच कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेट वापरणे आवश्यक आहे. वाहतूक नियमांचे पालन केल्यास अपघात टाळता येतात आणि सुरक्षित प्रवास शक्य होतो, यासाठी अशा जनजागृती रॅली उपयुक्त ठरत असल्याचेही त्यांनी नमूद केले.



