
मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळत असून, राष्ट्रवादी काँग्रेससह संपूर्ण राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष पवार कुटुंबाकडे लागले आहे. अशा संवेदनशील पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या पत्नी व राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असल्याची चर्चा निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे. मात्र, या शपथविधीपूर्वी त्यांना एक महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घ्यावा लागत आहे.

सुनेत्रा पवार या आपल्या राज्यसभा खासदारकीचा राजीनामा देणार असल्याचे निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्या आपला राजीनामा राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे सुपूर्द करणार असून, या घडामोडीमुळे महायुतीच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. गोविंदबागेत शरद पवार यांच्यासह संपूर्ण पवार कुटुंब एकत्र असताना, अजित पवार यांच्या अस्थी विसर्जनानंतर राजकीय घडामोडींना वेगळे वळण मिळाल्याचे चित्र दिसत आहे.
राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर सुनेत्रा पवार यांची आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळ गटनेता म्हणून अधिकृत निवड केली जाणार आहे. विधीमंडळात पक्षाची धुरा सांभाळण्यासाठी त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली जाणार असून, त्यामुळे त्यांच्या मंत्रिमंडळातील प्रवेशाचा मार्ग मोकळा होणार आहे. पक्षांतर्गत प्रक्रियेला वेग आला असून, वरिष्ठ नेत्यांकडून या निर्णयाला हिरवा कंदील मिळाल्याचे संकेत आहेत.
राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार, आजच संध्याकाळी ५.३० वाजता सुनेत्रा पवार राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. राजभवनावर होणारा हा शपथविधी सोहळा अत्यंत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडणार असून, राज्य मंत्रिमंडळात महिला प्रतिनिधी म्हणून त्यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे सोपवली जात असल्याचे बोलले जात आहे. राज्यपाल आचार्य देवव्रत हे संध्याकाळी चार वाजताच्या सुमारास मुंबईत दाखल होणार असून, त्यानंतर शपथविधी कार्यक्रम संपन्न होणार आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या राजकीय पोकळीमध्ये सुनेत्रा पवार यांची ही भूमिका राज्याच्या राजकारणाला नवी दिशा देणारी ठरणार असल्याचे मानले जात आहे. सहानुभूती, नेतृत्व आणि संघटनात्मक जबाबदारी यांचा समतोल साधत त्या पुढील वाटचाल कशी करतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.



