जळगाव प्रतिनिधी । भर दिवसा रिक्षात तरूणीची छेडखानी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार शहरात घडला असून संबंधीत तरूणाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत वृत्त असे की, एक विद्यार्थिनी दाणाबाजारात घरगुती साहित्य खरेदीसाठी गेली होती. तेथून ती रिक्षेने परत येत असताना शेजारी बसलेल्या मद्यधुंद तरुणाने तिची छेडखानी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने आरडाओरड केल्यानंतर जमावाने या तरुणाला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. नदीम महेमूद पिंजारी (वय २८, रा. हरिविठ्ठलनगर) असे मद्यधुंद युवकाचे नाव आहे. तर संबंधीत विद्यार्थीनी ही यावल तालुक्यातील आडगाव-कासारखेडे येथील असून ती जळगावच्या नूतन मराठा महाविद्यालयात बी.ए. तृतीय वर्षात शिकत आहे. दरम्यान, रिक्षात आधीच टारगट तरूण प्रवासी म्हणून बसून नंतर ते रिक्षात बसलेल्या महिला व तरूणीची छेड काढत असल्याचे प्रकार घडत असल्याच्या चर्चेला पुन्हा एकदा बळ मिळाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी कसून तपासणी करण्याची मागणी होत आहे.