नशिराबाद-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नशिराबाद गावातील मणियार मोहल्ला परिसरात मुलांच्या खेळण्याच्या कारणावरून दोन गटात वाद होऊन एका ३७ वर्षीय तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला केल्याची घटना २५ जानेवारी रोजी घडली आहे. या प्रकरणी बुधवारी २८ जानेवारी रोजी सकाळी ११.३० वाजता पीडित तरुणाने दिलेल्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलिसांनी संशयित आरोपींविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेख खलील अहमद सलीम मणियार (वय ३७) हे मणियार मोहल्ल्यात राहतात. रविवारी २५ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास सार्वजनिक ठिकाणी मुलांच्या खेळण्यावरून संशयित आरोपी शेख ओसामा शेख रहेमतुल्ला व त्याचे दोन नातेवाईक यांच्यासोबत त्यांचा वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. संशयित आरोपी शेख ओसामा शेख रहेमतुल्ला आणि त्याच्या दोन नातेवाईकांनी फिर्यादी शेख खलील यांना अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी शेख ओसामा याने लोखंडी रॉडने शेख खलील यांच्या डोक्यावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले. इतकेच नव्हे, तर आरोपीच्या इतर नातेवाईकांनी आणि वडिलांनी खलील यांना चापटाबुक्क्यांनी मारहाण करत ‘जीवे ठार मारण्याची’ धमकी दिली.

या घटनेनंतर जखमी शेख खलील यांनी २८ जानेवारी रोजी नशिराबाद पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली. त्यानुसार नशिराबाद पोलीस ठाण्यात संशयित आरोपी संशयित आरोपी शेख ओसामा शेख रहेमतुल्ला आणि त्याच्या दोन नातेवाईकांनी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी प्रशांत विरणारे हे करीत आहे.



