Home क्राईम रावेर तालुक्यातून वाढली लाकूड तस्करी; वृक्षप्रेमींमध्ये संताप

रावेर तालुक्यातून वाढली लाकूड तस्करी; वृक्षप्रेमींमध्ये संताप


रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | रावेर तालुक्यातून शेजारील मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर भागात मोठ्या प्रमाणावर अवैध लाकूड तस्करी सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे. या गंभीर प्रकाराकडे वनविभागाचे स्थानिक अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत असून, त्यामुळे वृक्षप्रेमी व पर्यावरणप्रेमींमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या तालुक्यात लाकूड तस्कर पुन्हा सक्रिय झाले असून वनक्षेत्रपाल श्रीकांत काळे यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. यापूर्वी तत्कालीन वनक्षेत्रपाल अजय बावणे यांच्या कार्यकाळात अवैध लाकूड तोडी व तस्करीवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण ठेवण्यात आले होते. मात्र सध्याच्या परिस्थितीत नियंत्रण शिथिल झाल्याची चर्चा नागरिकांतून होत आहे.

वनसंपदेची खुलेआम होत असलेली लूट आणि त्यावर होत नसलेली प्रभावी कारवाई यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जंगल क्षेत्रातील झपाट्याने होत असलेली वृक्षतोड भविष्यासाठी धोक्याची घंटा ठरत असल्याचे पर्यावरणप्रेमी सांगत आहेत.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ स्तरावर चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करावी, तसेच लाकूड तस्करीवर तातडीने आळा घालावा, अशी मागणी वृक्षप्रेमी व स्थानिक नागरिकांकडून जोर धरत आहे.


Protected Content

Play sound