पाचोरा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । प्रजासत्ताक दिनाच्या भाषणात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याने पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात आंबेडकरी समाजात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी पाचोरा शहरातील आंबेडकरी समाज बांधव व भगिणींनी एकत्र येत आंदोलन करत पोलिस प्रशासनास निवेदन दिले असून, गिरीश महाजन यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

मंगळवारी २७ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता पाचोरा शहरातील रेल्वे स्थानक रोडवरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून या आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. यानंतर उपस्थित समाजबांधवांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करत आपला रोष व्यक्त केला. प्रजासत्ताक दिनासारख्या राष्ट्रीय महत्त्वाच्या दिवशी संविधान शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख न करणे हे जाणीवपूर्वक केलेले कृत्य असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.

यानंतर निषेध मोर्चा काढत महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करण्यात आले. या संपूर्ण मार्गावर ‘बाबासाहेबांचा अपमान सहन केला जाणार नाही’, ‘संविधानाचा सन्मान राखावा’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. उपस्थितांनी गिरीश महाजन यांच्या भूमिकेचा तीव्र शब्दांत निषेध करत त्यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी केली.
आंदोलनादरम्यान पोलिस प्रशासनास दिलेल्या निवेदनात पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या वक्तव्यातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणी अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (अॅट्रॉसिटी अॅक्ट) गुन्हा दाखल करावा, तसेच नैतिक जबाबदारी स्वीकारून गिरीश महाजन यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी स्पष्ट मागणी निवेदनात नमूद करण्यात आली आहे.



