जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर येथील युवा खेळाडू दिनेश शशी बागडे याने राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करत जळगाव जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे. उत्तराखंड येथे झालेल्या पॅरा पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत १०७ किलो वजन गटात रौप्य पदक पटकावून त्याने क्रीडा क्षेत्रात आपली गुणवत्ता सिद्ध केली असून, या यशाची दखल घेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे त्याला ‘गुणवंत खेळाडू’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त जळगाव येथे आयोजित विशेष कार्यक्रमात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते दिनेश बागडे याला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सन्मानामुळे अमळनेर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, क्रीडाप्रेमींमधून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

या पुरस्कार वितरण सोहळ्यास जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांच्यासह विविध प्रशासकीय अधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांनी दिनेश बागडे याच्या मेहनत, चिकाटी आणि जिद्दीचे कौतुक करत भविष्यातील आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.
उत्तराखंड येथे पार पडलेल्या पॅरा पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत १०७ किलो वजन गटात दिनेश बागडे याने दमदार कामगिरी करत रौप्य पदक मिळवले होते. मर्यादांवर मात करत सातत्याने केलेल्या सरावाच्या जोरावर त्याने हे यश संपादन केले असून, तो अनेक तरुण खेळाडूंकरिता प्रेरणास्त्रोत ठरत आहे.
या सन्मानामुळे दिव्यांग खेळाडूंना प्रोत्साहन मिळणार असून, जिल्ह्यातील क्रीडा चळवळीला नवी ऊर्जा मिळेल, अशी भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. दिनेश बागडे यानेही पुरस्कार स्वीकारताना आपल्या कुटुंबीय, प्रशिक्षक आणि जिल्हा क्रीडा प्रशासनाचे आभार मानत आगामी स्पर्धांमध्ये आणखी मोठे यश मिळवण्याचा निर्धार व्यक्त केला.



