Home Cities जळगाव ‘ऑटोमेटेड फिटनेस सेंटर’साठी रिक्षाचालकांचा संघर्ष; प्रशासनाला दिला आंदोलनाचा इशारा

‘ऑटोमेटेड फिटनेस सेंटर’साठी रिक्षाचालकांचा संघर्ष; प्रशासनाला दिला आंदोलनाचा इशारा


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव आरटीओ कार्यालयातील ‘ऑटोमेटेड व्हेईकल फिटनेस टेस्टिंग सेंटर’ रद्द केल्याने जिल्ह्यातील व्यावसायिक वाहनधारकांचे मोठे हाल होत आहेत. या निर्णयाचा निषेध नोंदवण्यासाठी आणि जळगावात ही यंत्रणा पूर्ववत सुरू करण्यासाठी वीर सावरकर रिक्षा युनियनच्या वतीने आज, २२ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी आणि प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

दुसऱ्या शहरात धाव घेण्याची नामुष्की :
जिल्हाध्यक्ष दिलीपभाऊ सपकाळे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या शिष्टमंडळाने प्रशासनाच्या धोरणांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. जळगावात फिटनेस सेंटर नसल्यामुळे आता रिक्षाचालक आणि इतर वाहनधारकांना फिटनेस प्रमाणपत्रासाठी नाशिक किंवा छत्रपती संभाजीनगरला जावे लागत आहे. यामुळे इंधन, टोल आणि वेळेचा अपव्यय होत असून, रिक्षाचालकांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. “प्रशासकीय यंत्रणेच्या अभावामुळे रिक्षाचालकांना वेठीस धरून त्यांचा बळी का दिला जात आहे?” असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.

मॅन्युअल पद्धतीचा पर्याय सुचवला :
निवेदनात रिक्षाचालकांनी अत्यंत मार्मिक उदाहरण दिले. “जर एखादी व्यक्ती मृत्यू पावली आणि विधी करण्यासाठी यंत्रणा नसेल, तर आपण विधी थांबवतो का? आपण तो संपन्न करतोच. मग आरटीओ कार्यालयात जोपर्यंत नवीन सेंटर कार्यान्वित होत नाही, तोपर्यंत जुन्या मॅन्युअल पद्धतीने फिटनेस सर्टिफिकेट का दिले जात नाही?” असा रोकडा सवाल दिलीपभाऊ सपकाळे यांनी केला. जोपर्यंत अत्याधुनिक यंत्रणा जळगावात येत नाही, तोपर्यंत स्थानिक स्तरावरच तपासणी प्रक्रिया राबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

मोठ्या संख्येने उपस्थिती :
या आंदोलनात वाल्मिक सपकाळे, रमेश सोनार, शशिकांत जाधव, शांताराम पाटील, एकनाथ बारी यांच्यासह जिल्ह्यातील बहुसंख्य रिक्षाचालक आणि मालक सहभागी झाले होते. रिक्षाचालकांचे आर्थिक शोषण थांबवून मायबाप सरकारने या प्रश्नावर त्वरित तोडगा काढावा, अन्यथा भविष्यात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा वीर सावरकर रिक्षा युनियनने दिला आहे.


Protected Content

Play sound