Home प्रशासन पिचर्डे येथील पत्रकार धनराज पाटील यांना खान्देश भूषण पुरस्कार

पिचर्डे येथील पत्रकार धनराज पाटील यांना खान्देश भूषण पुरस्कार


भडगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पत्रकारितेच्या माध्यमातून समाजप्रबोधन, सत्यनिष्ठा आणि लोकशाही मूल्यांची जपणूक करणाऱ्या पत्रकारांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी खान्देश पत्रकार संघ, अभिनव खान्देश यांच्या वतीने राज्यस्तरीय जीवनगौरव व खान्देश भूषण पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात पिचर्डे (ता. भडगाव) येथील पत्रकार धनराज भिकन पाटील यांना सकारात्मक पत्रकारितेच्या योगदानाबद्दल खान्देश भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

६ जानेवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या दर्पण दिनाचे औचित्य साधून जाहीर करण्यात आलेले हे पुरस्कार संविधान बांधिलकी महोत्सवाच्या समारोपप्रसंगी व २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला प्रदान करण्यात येणार आहेत. समाजहित जपणारी, निर्भय व वस्तुनिष्ठ पत्रकारिता ही लोकशाहीचा मजबूत आधारस्तंभ असल्याचे अधोरेखित करण्यासाठी हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. “खिचो ना कमानों को, न तलवार निकालो; जब तोफ मुकाबिल हो, तो अखबार निकालो” या प्रेरणादायी विचारांच्या अनुषंगाने पत्रकारितेचे महत्त्व या निमित्ताने अधोरेखित करण्यात येणार आहे.

या पुरस्कार वितरण सोहळ्यात सन्माननीय भा. ई. नगराळे (आयएएस – निवृत्त), सेवानिवृत्त सचिव, आदिवासी कल्याण विभाग, मंत्रालय, महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न्यायमूर्ती बापूसाहेब जे. टी. देसले, अध्यक्ष – शिवतीर्थ ज्येष्ठ नागरिक संघ, धुळे हे भूषविणार आहेत. तसेच ज्येष्ठ साहित्यिक नानासाहेब सुभाषजी अहिरे, ज्येष्ठ पत्रकार बापूसाहेब ठाकूर, झेप मीडिया चे संचालक अनिल चव्हाण, दै. सकाळचे निखिल सूर्यवंशी, दै. लोकमतचे राजेंद्र शर्मा, राज्य समन्वयक अविनाश पाटील, ज्येष्ठ पत्रकार गो. पि. लांडगे आणि धुळे टीव्हीचे संचालक ललित चव्हाण आदी मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.

यंदाचे राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार भाऊसाहेब अरुण पाटील आणि दै. तोफचे ज्येष्ठ पत्रकार व संपादक गंगाधर दिनकर सोनवणे यांना जाहीर करण्यात आले आहेत. तर खान्देश भूषण पुरस्कारासाठी संपादक विश्वकर्मा प्रसाद (मालेगाव), प्रा. नेत्रदीपक कुवर (शहादा), भालचंद्र पाटील (धुळे), प्रा. रविंद्र निंबा पाटील, भगवान जगताप, ईश्वर महाजन (अमळनेर), योगेश हिरे (लोकमत साथी), धनराज भिकन पाटील (पिचर्डे), विनोद पाटील (सटाणा), प्रा. दीपक देशमुख (झोडगे) आणि रविंद्र खैरनार (साक्री) यांची निवड करण्यात आली आहे.

खान्देश पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर सूर्यवंशी, साक्री तालुका अध्यक्ष विलासराव देसले, उपाध्यक्ष महेंद्रभाऊ येवले, धुळे तालुका अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, प्रसिद्धी प्रमुख हर्षल महाजन यांच्यासह संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या पुरस्कारांमधून सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या पत्रकारांचा सन्मान होत असल्याचे मत व्यक्त केले आहे.

हा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा शनिवार, दिनांक २४ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १ वाजता स्व. शिंपी सभागृह, गरुड वाचनालयाच्या वर, जेल रोड, धुळे येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, वाचक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महासचिव प्रेमकुमार अहिरे, ज्येष्ठ संचालक रमेश आप्पा बोरसे, सचिव ज्ञानेश्वर माळी व संस्थापक संचालक प्राचार्य बी. बी. महाजन यांनी केले आहे.


Protected Content

Play sound