फैजपूर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । डिजिटल युगात वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर युवतींमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर येथे आयोजित आत्मनिर्भर युवती अभियानात सायबर सुरक्षेवर विशेष मार्गदर्शन सत्र घेण्यात आले. विद्यार्थिनींनी या सत्राला मोठ्या उत्साहाने प्रतिसाद दिला.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आणि धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी विकास विभाग व युवती सभा अंतर्गत पाच दिवसीय आत्मनिर्भर युवती अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक २३ जानेवारी २०२६ रोजी या अभियानाच्या पाचव्या दिवशी पोलीस उपनिरीक्षक विशाल पाटील (सावदा) यांनी सायबर सुरक्षा या विषयावर विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.

मार्गदर्शन करताना विशाल पाटील यांनी मोबाईल व इंटरनेटचा वापर अत्यंत सावधगिरीने करणे आवश्यक असल्याचे सांगितले. अनावश्यक ॲप्स डाऊनलोड टाळावेत, सोशल मीडियावर वैयक्तिक माहिती शेअर करू नये, तसेच ओटीपी, बँक तपशील व पासवर्ड कुणालाही देऊ नयेत, असे त्यांनी स्पष्ट केले. सायबर फसवणुकीचे विविध प्रकार समजावून सांगत, आर्थिक फसवणूक झाल्यास त्वरित १९३० या हेल्पलाईन क्रमांकावर किंवा सायबर क्राईम पोर्टलवर तक्रार नोंदवण्याचे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमास महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. कल्पना पाटील, युवती सभा प्रमुख डॉ. जयश्री पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या अभियानाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. सविता वाघमारे, डॉ. सरला तडवी, डॉ. सीमा बारी, डॉ. पल्लवी भंगाळे, प्रा. नाहीदा कुरेशी, प्रा. सुवर्णा पाटील तसेच इतर सर्व प्राध्यापिकांचे मोलाचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चेतना पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन नयना पाटील यांनी मानले. सायबर सुरक्षेसारख्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर मिळालेल्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थिनींमध्ये जागरूकता वाढली असून, कार्यक्रमाला युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.



