
जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील आव्हाने गावात गुरुवारी रात्री एका ३२ वर्षीय तरुणाची चौघांनी संगनमताने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सागर दिलीप बिऱ्हाडे असे मृत तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या खुनातील एकाला अटक केली असून उर्वरित फरार तीन आरोपींना तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी शुक्रवारी २३ जानेवारी रोजी दुपारी नातेवाईकांनी आणि लहुजी शक्ती ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात ठिय्या मांडला.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री किरकोळ वादातून सागर बिऱ्हाडे यांच्यावर चौघांनी प्राणघातक हल्ला केला होता, ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. मात्र, आरोपी अद्याप मोकाट असल्याने संतप्त नातेवाईकांनी आज दुपारी पोलीस अधीक्षक कार्यालयात जाऊन निवेदन सादर केले.
यावेळी लहुजी शक्ती ब्रिगेड आणि समाज बांधवांनी आक्रमक पवित्रा घेत स्पष्ट केले की, “जोपर्यंत सागर बिऱ्हाडे यांच्या हत्येतील सर्व आरोपींना पोलीस अटक करत नाहीत, तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही.” या निर्णयामुळे जिल्हा रुग्णालय आणि पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
पोलिस प्रशासनाने आंदोलकांना तपासाचे आश्वासन दिले असून, फरार आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत. एका तरुण मुलाचा असा निर्घृण खून झाल्यामुळे बिऱ्हाडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण आव्हाने गावात शोककळा पसरली आहे. गावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.



