Home Cities जळगाव नेत्र तपासणी ॲम्बुलन्स सर्वसामान्यांसाठी ठरणार ‘मायेची दृष्टी’ : पालकमंत्री

नेत्र तपासणी ॲम्बुलन्स सर्वसामान्यांसाठी ठरणार ‘मायेची दृष्टी’ : पालकमंत्री


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नेत्र तपासणी ॲम्बुलन्स सर्वसामान्यांसाठी ‘मायेची दृष्टी’ ठरणार असल्याचे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. गरजूंची सेवा करणे हेच खरे आमचे व्रत असून शेवटच्या घटकापर्यंत आरोग्यसेवा पोहोचलीच पाहिजे, यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील आहे. या फिरत्या नेत्र तपासणी ॲम्बुलन्सच्या माध्यमातून आता आरोग्यसेवा थेट गरिबांच्या दारात पोहोचणार असून जोपर्यंत समाजातील शेवटचा माणूस आरोग्यसंपन्न होत नाही, तोपर्यंत ही सेवा अखंड सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या २३ जानेवारी रोजी असलेल्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जीपीएस मित्र परिवाराच्या अत्याधुनिक फिरत्या नेत्र तपासणी ॲम्बुलन्सचे लोकार्पण करण्यात आले. याच वेळी पाळधी गावातील विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पणही पार पडले. प्रारंभी पालकमंत्र्यांच्या हस्ते शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

पालकमंत्री पाटील यांनी सांगितले की, आतापर्यंत रुग्णांना तपासणीसाठी पाळधी येथे यावे लागत होते. मात्र ग्रामीण भागातील वृद्ध व गरजू रुग्णांची गैरसोय लक्षात घेऊन आता ही अत्याधुनिक ॲम्बुलन्स थेट गावोगावी जाऊन नेत्र तपासणी करणार आहे. तपासणीनंतर आवश्यक रुग्णांना शस्त्रक्रिया व पुढील उपचारांसाठी पाठविण्यात येणार असून ही ॲम्बुलन्स सर्वसामान्यांसाठी खऱ्या अर्थाने ‘मायेची दृष्टी’ ठरणार आहे.

पाळधी व परिसरात पूर्ण झालेल्या विविध विकासकामांमुळे या भागाचा कायापालट झाला असून या कामांमुळे विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील व विक्रम पाटील यांच्या पुढाकारातून जीपीएस ग्रुपमार्फत आतापर्यंत ३३ मोफत नेत्र तपासणी शिबिरे घेण्यात आली असून २९,२६० रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. यामधून १०,९४० रुग्णांवर मोतिबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करण्यात आल्या आहेत. या उल्लेखनीय कार्याबद्दल उपस्थित ग्रामस्थांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील हे आमच्यासाठी खऱ्या अर्थाने दृष्टीदाता असल्याच्या भावना व्यक्त केल्या.

यावेळी पाळधी खुर्द, पोखरी, पोखरी तांडा व पाळधी बु. परिसरातील पोखरी–वराड रस्त्याचे डांबरीकरण, गावांतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण, मराठी व उर्दू शाळांसाठी नव्या खोल्यांचे बांधकाम, पाळधी खुर्द येथे संविधान भवन, विविध ठिकाणी ब्लॉक बसविणे, अल्पसंख्याक समाजासाठी शादीखाना हॉल तसेच एलईडी पथदिव्यांचे लोकार्पण करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जि. प. सदस्य प्रतापराव पाटील यांनी जीपीएस ग्रुपमार्फत राबविण्यात येणाऱ्या सामाजिक, आरोग्य व शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली. जनतेच्या विश्वासामुळेच हे सेवायज्ञ अखंड सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जीपीएस ग्रुपचे प्रशांत झंवर यांनी केले तर आभार जीपीएस स्कूल कॅम्पचे चेअरमन विक्रम पाटील यांनी मानले.

कार्यक्रमाला पाळधी बु. सरपंच विजय पाटील, पाळधी खु. सरपंच लक्ष्मीबाई शरद कोळी, उपसरपंच निसार शेख, लोकप्रतिनिधी, जीपीएस मित्र परिवाराचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound