जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय जळगाव येथे वार्षिक आंतरविभागीय क्रीडा महोत्सव ‘अश्वमेध’चे मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांमधील क्रीडावृत्ती, संघभावना आणि शारीरिक तंदुरुस्ती वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाची सुरुवात रंगतदार वातावरणात झाली.

या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास एस. गजरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यार्थी उपक्रम अधिष्ठाता डॉ. आर. बी. कांबळे, सह-अधिष्ठाता (विद्यार्थी उपक्रम) डॉ. मंगला आर. धोत्रे तसेच क्रीडा प्रमुख प्रा. आर. बी. उंबरकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. उद्घाटन समारंभात क्रीडा आयोजन समिती व विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदविला.

कार्यक्रमप्रसंगी अधिष्ठाता (शैक्षणिक) डॉ. एस. पी. मोहनी, स्थापत्य अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. व्ही. टी. पाटील, संगणक अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. के. आर. सरोदे, विद्युत अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. व्ही. पी. धोटे आणि यंत्र अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. एस. टी. वग्गे यांची विशेष उपस्थिती लाभली. सर्व मान्यवरांनी ‘अश्वमेध’ क्रीडा महोत्सवाच्या आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले.
महाविद्यालयाचा वार्षिक आंतरविभागीय क्रीडा महोत्सव असलेल्या ‘अश्वमेध’मध्ये यंदा विविध मैदानी आणि इनडोअर खेळांचा समावेश करण्यात आला आहे. क्रिकेट, बॉक्स क्रिकेट, कबड्डी, खो-खो, फुटबॉल, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, हँडबॉल, बॅडमिंटन, अॅथलेटिक्स, डॉज बॉल, दोरीखेच यांसह कॅरम, बुद्धिबळ आणि टेबल टेनिस या खेळांमुळे संपूर्ण महाविद्यालयीन परिसर क्रीडामय वातावरणाने भारावून गेला आहे.
या क्रीडा महोत्सवात महाविद्यालयातील विविध विभागांतील ४५० हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला असून, आपली क्रीडाकौशल्ये दाखविण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळत आहे. खेळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, शिस्त आणि सांघिक भावना विकसित होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
उद्घाटनप्रसंगी प्राचार्य डॉ. सुहास गजरे यांनी क्रीडा आयोजन समितीचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक अभ्यासासोबतच क्रीडाक्षेत्रातही सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करत त्यांनी क्रीडा स्पर्धा व्यक्तिमत्त्व विकासासाठी महत्त्वाच्या असल्याचे नमूद केले.



