Home राजकीय कल्याण-डोंबिवलीत स्थिरतेसाठी शिंदेसेनेला पाठिंबा ; मनसे नेते राजू पाटील यांचा स्पष्ट खुलासा

कल्याण-डोंबिवलीत स्थिरतेसाठी शिंदेसेनेला पाठिंबा ; मनसे नेते राजू पाटील यांचा स्पष्ट खुलासा


डोंबिवली-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । कल्याण-डोंबिवली महापालिका राजकारणात सुरू असलेल्या आकडेमोडीला पूर्णविराम देत मनसेने शिंदेसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असून, या निर्णयामागची भूमिका मनसे नेते राजू पाटील यांनी उघडपणे मांडली आहे. सत्तासंघर्ष, पळवापळवी आणि अस्थिरतेमुळे कंटाळलेल्या जनतेच्या हितासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कल्याण-डोंबिवलीत भाजपाला ५० तर शिंदेसेनेला ५३ जागा मिळाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून राजकीय गणिते जुळवण्याचे प्रयत्न सुरू होते. या काळात नगरसेवकांची पळवापळवी, आकडेमोड आणि अनिश्चिततेमुळे भविष्यात होणाऱ्या समित्यांच्या निवडणुकांमध्येही गोंधळ होण्याची शक्यता निर्माण झाली होती. ही परिस्थिती थांबावी आणि प्रशासनात स्थिरता यावी, या उद्देशाने मनसेने शिंदेसेनेला पाठिंबा दिल्याचे राजू पाटील यांनी सांगितले.

कोकण भवनात नगरसेवकांची गट नोंदणी केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना राजू पाटील म्हणाले की, सत्ता मिळवण्यासाठी किंवा वैयक्तिक लाभासाठी हा निर्णय घेतलेला नाही. सत्तेत राहिल्याने विकासकामांना गती मिळेल आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय देता येईल, या भूमिकेतून आम्ही पाठिंबा दिला आहे. शिंदेसेना आणि भाजपा एकत्र लढले असल्याने भाजपाला बाजूला ठेवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मनसेने यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या पक्षासोबत युतीत निवडणूक लढवली होती. मात्र निकालानंतर काही नगरसेवक गायब झाल्याने केवळ आपल्या नगरसेवकांचीच नव्हे तर एकूणच राजकीय स्थैर्याची चिंता वाढली होती. कल्याण-डोंबिवलीतील जनता या पळवापळवीच्या राजकारणाला कंटाळली असून, हे कुठेतरी थांबले पाहिजे, या भावनेतूनच हा निर्णय घेतल्याचे पाटील यांनी सांगितले.

राजू पाटील यांनी स्पष्ट केले की, ५ नगरसेवकांच्या बळावर सत्तेबाहेर राहून जनतेला न्याय देता आला असता का, हा प्रश्न आम्ही स्वतःलाच विचारला. सत्तेत राहिल्यास किमान समान कार्यक्रमाच्या माध्यमातून अंकुश ठेवता येईल, जनतेचे मुद्दे मांडता येतील आणि विकासकामांवर लक्ष ठेवता येईल, अशी भूमिका त्यांनी मांडली. भलेही सत्ता पाडण्याइतकी ताकद नसली तरी जनहितासाठी प्रभावी भूमिका बजावता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

निवडणुकीपूर्वी मनसे, उद्धवसेना आणि अन्य पक्षांमध्ये टीका-टिप्पणी झाली होती. काही ठिकाणी मनसे आणि उद्धवसेनेचे उमेदवार आमनेसामने होते, मात्र निवडणूक संपल्यानंतर स्थानिक पातळीवर परिस्थिती पाहून निर्णय घेणे आवश्यक असल्याचे राजू पाटील यांनी सांगितले. जेव्हा निकाल समोर आले आणि संपूर्ण राजकीय गणित राज ठाकरे यांच्यासमोर मांडले, तेव्हा स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेण्याची मुभा साहेबांनी दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, मनसे नेते संदीप देशपांडे यांनीही या निर्णयाचे समर्थन केले आहे. कल्याण-डोंबिवलीत सर्वच पक्षांविरोधात मनसे लढली होती, आठ ठिकाणी उद्धवसेनेचे उमेदवारही मनसेविरोधात होते. निवडणूक झाल्यानंतर निवडून आलेल्या नगरसेवकांना स्थानिक जनतेच्या हिताला प्राधान्य देत निर्णय घेण्याची मुभा पक्षाने दिली होती. त्यानुसार परिस्थितीचा अभ्यास करून राजू पाटील यांनी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.


Protected Content

Play sound