
हिवरखेड-वृत्तसेवा । अकोट नगरपालिकेनंतर आता हिवरखेड नगर परिषदेतही राजकीय वर्तुळाला धक्का देणारा प्रकार समोर आला आहे. येथील बाल कल्याण समितीच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला थेट काँग्रेस आणि एमआयएमच्या नगरसेवकांनी पाठिंबा दिल्याने ‘छुप्या युती’ची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या अनपेक्षित आणि ‘विचित्र’ राजकीय जुळवाजुळवीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी तीव्र शब्दांत निशाणा साधला आहे.

हिवरखेड नगर परिषदेतील सभापती व विविध विषय समित्यांच्या निवडी २० जानेवारी रोजी पार पडल्या. बाल कल्याण समितीच्या उपसभापती पदासाठी भाजपकडून अनिता वाकोडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, या अर्जावर सूचक म्हणून काँग्रेसच्या नगरसेविका रुबिजा अब्दुल सलमान यांची स्वाक्षरी असून अनुमोदक म्हणून एमआयएमचे नगरसेवक आजम खान सुभेदार खान यांची नोंद आहे. परस्पर कट्टर विरोधक मानले जाणारे तीन पक्ष एका उमेदवारासाठी एकत्र आल्याचे स्पष्ट पुरावे समोर आल्याने जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
या पार्श्वभूमीवर अंबादास दानवे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत जोरदार टीका केली. “हिवरखेडमध्ये महायुती की महाखिचडी? भाजप उमेदवार – अनिता वाकोडे, सूचक – काँग्रेस, अनुमोदक – एमआयएम. भाजपच्या ‘लग्नाला’ काँग्रेस आणि एमआयएम वाजंत्री म्हणून हजर आहेत. इम्तियाज जलीत आणि भाजपला ऑल द बेस्ट,” असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला. त्यांच्या या पोस्टमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा स्थानिक पातळीवरील ‘सोयीच्या युतीं’वर चर्चा रंगली आहे.
हिवरखेड नगर परिषदेत एकूण २० जागा असून भाजपकडे ११, शिंदे शिवसेनेकडे ५, काँग्रेसकडे २, वंचितकडे १ आणि एमआयएमकडे १ जागा आहे. नगराध्यक्षपदी भाजपच्या सुलभा दुतोंडे विजयी झाल्या आहेत. संख्याबळ असूनही भाजप उमेदवाराला काँग्रेस व एमआयएमचा पाठिंबा का घ्यावा लागला, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
काही महिन्यांपूर्वी अकोट नगरपालिकेत भाजप आणि एमआयएमने एकत्र येत सत्ता स्थापन केली होती, तर बदलापूरमध्ये काँग्रेसने भाजपला साथ दिली होती. या घटनांनंतर भाजपसह इतर पक्षांच्या वरिष्ठ नेतृत्वाने स्थानिक पदाधिकाऱ्यांना अशा युती टाळण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या होत्या. एमआयएमकडूनही भाजपपासून अंतर ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, हिवरखेडमध्ये या सर्व आदेशांना केराची टोपली दाखवण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. या स्थानिक पातळीवरील ‘महाखिचडी’वर भाजप, काँग्रेस आणि एमआयएमचे वरिष्ठ नेतृत्व नेमकी कोणती भूमिका घेते आणि संबंधित नगरसेवकांवर कारवाई होते का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.



