
जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । लग्नासाठी मुलगी शोधणाऱ्या तरुणांना आपल्या जाळ्यात ओढून, लग्नाचे नाटक करत लाखो रुपये उकळणाऱ्या एका ‘लुटारू नवरी’च्या टोळीसमोर आली आहे. या टोळीने दोन मित्रांची मिळून ३ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केली असून, जळगाव तालुका पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी लक्ष्मण राजेंद्र भदाणे (वय २८, रा. सीतासोनू नगर, जळगाव) आणि त्यांचा मित्र गणेश दत्तू काथार हे लग्नासाठी मुलगी शोधत होते. याचा फायदा घेत आरोपी महिलांनी संगनमताने एक कट रचला. बनावट आधारकार्ड तयार करून आणि खोटे नातेवाईक उभे करून त्यांनी लक्ष्मण आणि गणेश या दोघांसोबत लग्नाचे नाटक केले. लग्नाचे सोपस्कार उरकण्यासाठी आणि इतर खर्चाच्या बहाण्याने आरोपींनी लक्ष्मणकडून १ लाख ७० हजार रुपये आणि गणेशकडून १ लाख ७० हजार रुपये, अशी एकूण ३ लाख ४० हजार रुपयांची रक्कम उकळली.
पैसे उकळल्यानंतर काही दिवसातच या महिलांनी आपले रंग दाखवण्यास सुरुवात केली. फिर्यादीला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी विचारणा केली असता, त्यांना अश्लील शिवीगाळ करून धमकी देण्यात आली. ही टोळी पालघर जिल्ह्यातील असून, बनावट लग्नाद्वारे तरुणांना लुबाडण्याचे काम करत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
गुन्हा दाखल आणि तपास याप्रकरणी लक्ष्मण भदाणे यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी मनीषा संजय जैन (रा. राजाराम नगर, जळगाव), कविता कन्हैयालाल पटेल, सविता कन्हैयालाल पटेल, सविताचे कथित आई-वडील आणि राणीताई किन्नर (सर्व रा. पालघर) यांच्याविरुद्ध जळगाव तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



