दिल्ली -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा। दिल्लीहून पश्चिम बंगालमधील बागडोगरा येथे जाणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्याने सकाळी मोठा थरार निर्माण झाला. आकाशात हजारो फूट उंचावर असताना विमानात सापडलेल्या एका संशयास्पद चिठ्ठीमुळे २२२ प्रवाशांचा जीव अक्षरशः टांगणीला लागला आणि अखेर विमानाचे तातडीने लखनौ विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.

इंडिगोचे फ्लाइट क्रमांक 6E 6650 सकाळच्या सुमारास दिल्लीहून बागडोगरासाठी रवाना झाले होते. विमान सुरक्षितपणे उड्डाण करत असतानाच अचानक एका कर्मचाऱ्याला विमानातील टॉयलेटमध्ये हाताने लिहिलेली चिठ्ठी आढळून आली. टिशू पेपरवर “विमानात बॉम्ब आहे” असे स्पष्ट शब्दांत लिहिलेले होते. ही बाब समजताच विमानातील कर्मचाऱ्यांनी तत्काळ वैमानिकांना माहिती दिली आणि वैमानिकांनी कोणताही विलंब न करता एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क साधला.

सकाळी ८.४६ वाजण्याच्या सुमारास लखनौच्या एटीसीला या गंभीर घटनेची माहिती मिळाली. सुरक्षेचा धोका लक्षात घेता विमानाचा मार्ग तातडीने बदलण्यात आला. साधारण ९.१७ वाजता लखनौ येथील चौधरी चरण सिंह आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानाचे सुरक्षित इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. विमान धावपट्टीवर उतरताच संपूर्ण विमानतळावर हाय अलर्ट घोषित करण्यात आला आणि सुरक्षा यंत्रणांनी विमानाला चारही बाजूंनी घेरले.
लँडिंगनंतर बॉम्ब शोधक पथक, स्थानिक पोलिस आणि केंद्रीय सुरक्षा दलांनी विमानाचा ताबा घेतला. सर्व २२२ प्रवासी आणि कर्मचारी यांना शांतपणे व सुरक्षितपणे विमानाबाहेर काढण्यात आले. एसीपी रजनीश वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात विमानाची सखोल तपासणी करण्यात आली असून अद्याप कोणतीही संशयास्पद वस्तू आढळलेली नाही. मात्र, धमकी देणारी चिठ्ठी कोणी आणि कोणत्या उद्देशाने ठेवली, याचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुरावे तपासले जात आहेत.
या घटनेमुळे काही काळ लखनौ विमानतळावरील हालचालींवरही परिणाम झाला. प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण असतानाच इंडिगो एअरलाइन्सकडून प्रवाशांना पुढील प्रवासासाठी पर्यायी व्यवस्था करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. बागडोगरा येथे पोहोचण्यासाठी आवश्यक त्या सोयी-सुविधा पुरवण्यात येत असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.
गेल्या काही काळात देशभरात विमानांना बॉम्बच्या खोट्या धमक्या मिळण्याचे प्रकार वाढले असून, त्यामुळे विमान कंपन्या, सुरक्षा यंत्रणा आणि प्रवाशांचा तणाव अधिकच वाढत आहे. या पार्श्वभूमीवर अशा घटनांवर कठोर कारवाईची गरज असल्याची मागणीही पुन्हा एकदा पुढे आली आहे.



