जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील बळीराम पेठ परिसरात दारूच्या पैशांच्या वादातून एका तरुणावर तलवारीने सपासप वार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ‘दारू पिण्यासाठी पैसे दे’ असे म्हणत संशयित आरोपीने भररस्त्यात तलवारीने हल्ला चढवून हिमांशू रितेश चंदनकर (वय २५) या तरुणाला गंभीर जखमी केले. याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिमांशू चंदनकर हा तरुण बळीराम पेठेतील १७ नंबर शाळेच्या परिसरात राहतो. शुक्रवारी दुपारी तो आपल्या घराजवळ बसून महापालिका निवडणुकीच्या निकालाच्या बातम्या पाहत होता. त्याच वेळी शिवकॉलनीतील रहिवासी संशयित निर्भय उर्फ ‘गोट्या’ रवींद्र पाटील हा त्या ठिकाणी आला. त्याने हिमांशूकडे दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली.हिमांशूच्या भावाने आणि हिमांशूने पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला. याचा राग अनावर झाल्याने गोट्या पाटीलने अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

वाद वाढत गेल्याने संशयिताने आपल्याकडे लपवून ठेवलेली धारदार तलवार काढली आणि हिमांशूवर हल्ला केला. हा वार हिमांशूच्या हातावर लागल्याने तो गंभीर जखमी झाला असून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला आहे. पोलिसांत गुन्हा दाखल भरदिवसा झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. जखमी हिमांशू चंदनकर याने दिलेल्या तक्रारीवरून जळगाव शहर पोलीस ठाण्यात संशयित निर्भय उर्फ गोट्या पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश पाटील करत आहेत.



