जळगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी| कृतिम बुद्धीमत्ता (एआय) च्या जागतिक स्पर्धेत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव येथील संगणक अभियांत्रिकी विभागातील प्राध्यापक प्रा. शैलेश डी. चेके व शिरपूर(जिल्हा. धुळे) येथील डॉ. तुकाराम काशिनाथ गवळी यांनी महाराष्ट्र शासनाच्या फॅकल्टी एनेबलमेंट प्रोग्राम अंतर्गत एन्विडिया असोसिएट जनरेटिव्ह एआय एलएलएम्स हे प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रमाणपत्र यशस्वीरीत्या प्राप्त केले आहे. ही परीक्षा अत्यंत आव्हानात्मक असून ती उत्तीर्ण करणे कठीण मानले जाते.
हे प्रमाणपत्र इन्व्हिडिया व महाराष्ट्र शासन यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार (MoU) पूर्ण करण्यात आले असून, याचा उद्देश राज्यातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) शिक्षण, कौशल्य विकास व क्षमता वृद्धी करणे हा आहे.

एन्विडिया असोसिएट जनरेटिव्ह एआय एलएलएम्स हा अभ्यासक्रम अत्याधुनिक एआय तंत्रज्ञानावर आधारित असून त्यामध्ये एआय, मशीन लर्निंग, डीप लर्निंग, लार्ज लँग्वेज मॉडेल्स (LLMs), प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग, जनरेटिव्ह एआय अनुप्रयोग, रिस्पॉन्सिबल एआय , नैतिकता व इन्व्हिडिया एआय इकोसिस्टम यांचा सखोल अभ्यास समाविष्ट आहे.
प्रा. शैलेश डी. चेके यांनी यापूर्वी परम युवा-२ या कार्यक्रमांतर्गत भारतीय सुपरकॉम्प्युटर येथे इंटर्नशिप पूर्ण केली आहे. हा सुपरकॉम्प्युटर टॉप ५०० यादीत जागतिक स्तरावर ६९व्या क्रमांकावर असून, त्यांनी तेथे हाय परफॉर्मन्स कम्प्युटिंग (HPC) इन्फ्रास्ट्रक्टोर वर प्रत्यक्ष काम केले आहे.
त्याचप्रमाणे, डॉ. तुकाराम काशिनाथ गवळी यांना औद्योगिक क्षेत्रातील समृद्ध अनुभव असून, अलीकडेच त्यांना एनपीटीएल कडून दोन वेळा “टॉप परफॉर्मिंग मेन्टर” पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे, ही बाब त्यांच्या शैक्षणिक व मार्गदर्शक कार्याची दखल दर्शविते.
या प्रमाणपत्रामुळे संस्थेच्या उदयोन्मुख एआय क्षेत्रातील शैक्षणिक व संशोधन क्षमतेत लक्षणीय वाढ झाली असून, अभ्यासक्रम अध्यापन, संशोधन उपक्रम व विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासामध्ये जनरेटिव्ह एआय तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर शक्य होणार आहे.
या प्रमाणपत्राच्या थेट परिणामस्वरूप, प्रा. शैलेश डी. चेके व शिरपूर (जिल्हा. धुळे) येथील डॉ. तुकाराम काशिनाथ गवळी यांना लवकरच इन्व्हिडिया एआय कोच अर्थात कृतिम बुद्धिमत्ता करिता इन्व्हिडिया तर्फे मार्गदर्शक म्हणून मान्यता मिळणार असून, ते विद्यार्थी व प्राध्यापकांसाठी एआय प्रशिक्षण कार्यक्रम, कार्यशाळा व मार्गदर्शन उपक्रम राबविणार आहेत. यामुळे संस्थेत तसेच परिसरात एआय-आधारित नवोन्मेषाला चालना मिळणार आहे.
या यशाबद्दल मा. प्राचार्य डॉ. सुहास एस. गाजरे तसेच विभागप्रमुख प्रा. के. आर. सरोदे यांनी दिलेल्या विश्वास, प्रोत्साहन व सातत्यपूर्ण मार्गदर्शनाबद्दल प्राध्यापकांनी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली असून त्यांचा इंडस्ट्रीतील आणि नवीन टेक्नॉलॉजी वरील कामांचा उपयोग सर्वांनाच होईल याची खात्री दिली आहे.



