Home Cities अमळनेर ….अन्यथा १९ रोजी कुटुंबासह अमरण उपोषण करणार ; एकतास येथील गोकुळ पाटील...

….अन्यथा १९ रोजी कुटुंबासह अमरण उपोषण करणार ; एकतास येथील गोकुळ पाटील यांचा इशारा


अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील एकतास गावात वडिलोपार्जित घराच्या मालकीवर बेकायदेशीर फेरफार करून मिळकत हडप केल्याचा गंभीर आरोप करत एका नागरिकाने प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने आता कुटुंबासह अमरण उपोषणास बसण्याचा इशारा दिल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

एकतास येथील रहिवासी गोकुळ आनंदा पाटील (बच्छाव) यांनी दिलेल्या निवेदनानुसार, त्यांचे घर मिळकत क्रमांक 53 हे वडिलोपार्जित असून आजतागायत त्यांच्या ताब्यात व उपभोगात आहे. मात्र, काही वर्षांपासून गावातील काही व्यक्तींकडून मानसिक व शारीरिक त्रास दिला जात असून, त्यांना बेघर करण्याचा कट रचला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यापूर्वी मारहाणीच्या प्रकरणात त्यांनी तब्बल 35 जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यानंतरही छळ सुरूच असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रकरणात हिराबाई भास्कर पाटील आणि तत्कालीन ग्रामसेवक तसेच ग्रामपंचायतीतील काही पदाधिकाऱ्यांनी संगनमत करून शासन दप्तरी नमुना 8 मध्ये बेकायदेशीर फेरफार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. कोणताही व्यवहार, विक्री किंवा तारण नसताना घराच्या नोंदीत परस्पर दुसऱ्याचे नाव लावण्यात आल्याचे फिर्यादीचे म्हणणे आहे. याची माहिती मिळाल्यानंतर ग्रामपंचायतीकडे उताऱ्यासाठी गेले असता, घराशी आपला संबंध नसल्याचे सांगत अडवणूक करण्यात आली आणि जबरदस्तीने कर भरण्यास भाग पाडल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी पंचायत समिती, ग्रामपंचायत आणि इतर कार्यालयांमध्ये अर्ज दिल्यानंतरही समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचे पाटील यांनी सांगितले. याचदरम्यान, अमळनेर येथे दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांना धमकावून मारहाण केल्याचा गंभीर आरोप असून, घर परत हवे असल्यास सर्व केसेस मागे घ्या, अन्यथा जीवाला धोका असल्याची धमकी दिल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.

संपूर्ण प्रकार हा नियोजित कट असून ग्रामपंचायतीतील काही पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा गैरप्रकार झाल्याचा आरोप करत, संबंधित दस्तऐवजांची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. दोषींवर फसवणूक आणि शासकीय दप्तरी बेकायदेशीर फेरफार केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

वारंवार लेखी तक्रारी देऊनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने, अखेर दिनांक 19 जानेवारी 2026 रोजी अमळनेर उपविभागीय अधिकारी कार्यालयाबाहेर कुटुंबासह अमरण उपोषणास बसण्याचा निर्णय घेतल्याचे गोकुळ पाटील यांनी जाहीर केले आहे. भविष्यात स्वतःला किंवा कुटुंबातील सदस्यांना काहीही अनुचित घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित आरोपी आणि प्रशासनाची असेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.


Protected Content

Play sound