Home टेक्नोलॉजी ई-कोर्ट प्रणालीने बोदवड न्यायालयाच्या कामकाजाला संजीवनी 

ई-कोर्ट प्रणालीने बोदवड न्यायालयाच्या कामकाजाला संजीवनी 


बोदवड-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । बदलत्या काळानुसार न्यायदानाची प्रक्रिया अधिक वेगवान, पारदर्शक आणि सुलभ व्हावी या उद्देशाने बोदवड न्यायालयात सुरू करण्यात आलेल्या ई-कोर्ट प्रणालीमुळे न्यायालयीन कामकाजात आमूलाग्र बदल घडून आला आहे. १ नोव्हेंबर रोजी उद्घाटन झालेल्या या प्रणालीमुळे वकील, पक्षकार आणि गरजू नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, बोदवड न्यायालयाच्या कामकाजाला खऱ्या अर्थाने ‘संजीवनी’ मिळाल्याचे मत वकील संघाचे अध्यक्ष ॲड. अर्जुन पाटील यांनी व्यक्त केले.

या पार्श्वभूमीवर जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एम. शेख यांनी बोदवड न्यायालयास भेट देत ई-कोर्ट प्रणालीचा प्रत्यक्ष आढावा घेतला. यावेळी त्यांनी ई-फायलिंग, व्हिडिओ शपथ तसेच ई-कोर्ट प्रणालीतील विविध तांत्रिक बाबींची सखोल पाहणी केली. डिजिटल न्यायव्यवस्थेमुळे कामकाजात गती आणि पारदर्शकता वाढत असल्याचे त्यांनी नमूद करत, ही प्रणाली अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.

जिल्हा न्यायाधीश शेख यांनी वकील, पक्षकार आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. ई-कोर्ट प्रणालीच्या अंमलबजावणीत येणाऱ्या तांत्रिक अडचणी, ई-फायलिंग प्रक्रियेत सुधारणा आणि भविष्यातील गरजा याबाबत त्यांनी महत्त्वाच्या सूचना दिल्या. या भेटीदरम्यान बोदवड न्यायालयाचे न्यायाधीश आतिश खोल्लम यांची प्रमुख उपस्थिती होती.

वकील संघाच्या वतीने जिल्हा न्यायाधीशांचे स्वागत करताना ॲड. अर्जुन पाटील यांनी सांगितले की, ई-फायलिंग प्रणालीमुळे न्यायालयीन कामकाज गतिमान झाले असून, तालुक्यातील वकील आणि पक्षकारांना वारंवार न्यायालयात येण्याची गरज कमी झाली आहे. त्यामुळे वेळ आणि खर्चाची मोठी बचत होत आहे. भविष्यात अधिकाधिक कामकाज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमाच्या औचित्याने जिल्हा न्यायाधीश ए. एम. शेख यांनी उपस्थित वकील संघ आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी वकील संघाचे उपाध्यक्ष ॲड. धनराज प्रजापती, ॲड. किशोर महाजन, ॲड. के. एस. इंगळे, ॲड. अमोल परदेशी, ॲड. निलेश लढे, ॲड. विकास शर्मा, ॲड. सी. के. पाटील, ॲड. सुनील डी. जाधव, ॲड. योगेश राजपूत, ॲड. कल्पेश बडगुजर यांच्यासह भुसावळ येथील वकील मंडळी आणि मोठ्या संख्येने पक्षकार उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. अमोल परदेशी यांनी केले, प्रास्ताविक ॲड. अर्जुन पाटील यांनी मांडले तर आभार प्रदर्शन ॲड. किशोर महाजन यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी न्यायालयीन अधीक्षक वैभव तरटे, श्रीराम भट, एस. डी. गरड, प्रशांत कुमार वेदरकर, एस. एस. खेडकर, अविनाश राठोड आदी कर्मचारी वर्गाने विशेष परिश्रम घेतले.


Protected Content

Play sound