Home राजकीय महापालिका निवडणुकांत एमआयएमची जोरदार मुसंडी ; मुंबईसह 13 महापालिकांत 95 जागांवर विजय

महापालिका निवडणुकांत एमआयएमची जोरदार मुसंडी ; मुंबईसह 13 महापालिकांत 95 जागांवर विजय


मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । मुंबईसह राज्यातील 29 महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर होत असताना महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाची उलथापालथ पाहायला मिळत आहे. भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरी या निवडणुकांतील सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे असदुद्दीन ओवेसी यांच्या नेतृत्वाखालील एमआयएम पक्षाने घेतलेली मोठी झेप होय. एमआयएमने राज्यातील 29 पैकी तब्बल 13 महापालिकांमध्ये एकूण 95 जागांवर विजय मिळवत आपली ताकद अधोरेखित केली आहे.

विशेष म्हणजे एमआयएमने मुंबई महानगरपालिकेतही जोरदार मुसंडी मारली आहे. पारंपरिक पक्षांचा प्रभाव असलेल्या अनेक भागांत एमआयएमच्या उमेदवारांनी विजय मिळवला असून, समाजवादी पक्षाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या मानखुर्दमध्येही एमआयएमने बाजी मारली आहे. यामुळे समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांना मोठा राजकीय धक्का बसल्याचे मानले जात आहे.

मुंबईत एमआयएमच्या सहा उमेदवारांनी विजय मिळवला आहे. त्यामध्ये प्रभाग क्रमांक 134 मधून मेहजबिन खान, 136 मधून जमीर कुरेशी, 137 मधून समीर पटेल, 138 मधून रोशन शेख, 139 मधून शबाना शेख आणि 145 मधून खैरुनिसा हुसेन यांचा समावेश आहे. या निकालामुळे मुंबईतील राजकीय समीकरणांमध्ये एमआयएमची उपस्थिती ठळकपणे जाणवू लागली आहे.

राज्यभरात पाहता एमआयएमला छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठे यश मिळाले असून तेथे पक्ष दुसऱ्या क्रमांकावर आहे. उमेदवार निवडीवरून मोठा वाद होऊनही एमआयएमने येथे 24 जागांवर विजय मिळवला आहे. मालेगावमध्ये एमआयएमचे 20 उमेदवार विजयी झाले असून, हा किल्ला अधिक भक्कम झाल्याचे चित्र आहे.

सोलापूर, धुळे आणि नांदेड या तीन महानगरपालिकांमध्ये प्रत्येकी 8 जागांवर एमआयएमचे उमेदवार विजयी झाले असून, एकूण 24 नगरसेवक या शहरांतून निवडून आले आहेत. अमरावतीत 6, ठाण्यात 5, नागपुरात 4 तर चंद्रपूरमध्येही एमआयएमने पहिल्यांदाच विजयाचे खाते उघडले आहे. या निकालांमुळे समाजवादी पक्षाला अनेक ठिकाणी पिछाडीवर पडावे लागले असून, अल्पसंख्याक मतदारांमध्ये एमआयएमची वाढती पकड स्पष्ट झाली आहे.

या निवडणुकांसाठी एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी राज्यभर जोरदार प्रचार केला होता. अनेक ठिकाणी त्यांनी सभा घेतल्या होत्या. अकोल्यातील सभेदरम्यान गदारोळ, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये खासदार इम्तियाज जलील यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न अशा वादग्रस्त घटनाही घडल्या. मात्र, या सर्व पार्श्वभूमीवरही एमआयएमने महाराष्ट्रात लक्षणीय यश मिळवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.


Protected Content

Play sound