Home Cities जळगाव मतदान केंद्रावर मतदानासाठी मतदारांच्या लांबच लांब रांगा!

मतदान केंद्रावर मतदानासाठी मतदारांच्या लांबच लांब रांगा!


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव महानगरपालिकेच्या ७५ नगरसेवक पदांसाठी आज पार पडलेली मतदान प्रक्रिया काही किरकोळ वाद वगळता अत्यंत शांततेत आणि उत्साहात पार पडली. सकाळच्या सत्रात मतदारांचा प्रतिसाद संथ असला, तरी सायंकाळच्या वेळी मतदान केंद्रांवर मतदारांची तुफान गर्दी पाहायला मिळाली. शहरातील १९ प्रभागांमधील लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी जळगावकरांनी मोठ्या संख्येने घराबाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजावला.

प्रशासकीय नियोजन आणि मतदान केंद्र :
महानगरपालिकेच्या ७५ जागांसाठी शहरात एकूण १६९ मतदान केंद्रे उभारण्यात आली होती, ज्यामध्ये ५१६ बूथवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली होती. सकाळपासूनच प्रशासकीय यंत्रणा सज्ज होती. दुपारी मतदानाचा वेग मंदावला होता, मात्र दुपारी ४ वाजेनंतर सर्वच केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसून आले. अनेक केंद्रांवर सायंकाळी उशिरापर्यंत नागरिक मतदानासाठी थांबले होते.

पोलीस दलाचा कडक बंदोबस्त :
निवडणूक निर्भय आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी जळगाव जिल्हा पोलीस दलाने चोख नियोजन केले होते. संभाव्य उपद्रव टाळण्यासाठी पोलिसांनी निवडणूक पूर्व ९७ जणांवर तडीपारीची कारवाई केली होती, ज्यामुळे शहरात शांतता राखण्यास मदत झाली. एकूण १६९ केंद्रांपैकी ६१ संवेदनशील केंद्रांवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

वरिष्ठ अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष गस्त :
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि विभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांनी दिवसभर शहरातील विविध संवेदनशील भागांना भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. “शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस दल सतर्क होते, किरकोळ शाब्दिक चकमकी सोडल्या तर संपूर्ण प्रक्रिया शांततेत सुरू असल्याची माहिती पोलीस प्रशासनातर्फे देण्यात आली.


Protected Content

Play sound