रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष पदासाठी सोमवारी पार पडलेली निवडणूक प्रक्रिया अत्यंत नाट्यमय आणि ओढताण वळणाने गाजली. सभेपूर्वीच दोन राजकीय गटांमध्ये झालेल्या जोरदार वादावादीत एका नगरसेवकाचे कपडे फाटल्याची धक्कादायक घटना घडली. या अभूतपूर्व गदारोळानंतर झालेल्या मतदानात राजकीय गणिते पूर्णपणे उलटली असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) उमेदवार आसिफ मोहम्मद यांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव करत उपनगराध्यक्ष पदावर कब्जा मिळवला आहे.
निवडणुकीपूर्वीच ‘राडा’ आणि तणाव :
सोमवारी १२ जानेवारी रोजी उपनगराध्यक्ष निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेला सुरुवात होण्यापूर्वीच नगरपालिका परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि भाजप-अजित पवार गट यांच्या समर्थकांमध्ये चकमक उडाली. मतदान करण्यासाठी चाललेली ओढताण इतकी वाढली की, शरद पवार गटाचे नगरसेवक गणेश सोपान पाटील यांच्या अंगावरील कपडे फाडण्यापर्यंत कार्यकर्त्यांची मजल गेली. या घटनेमुळे नगरपालिका परिसरात काही वेळ घबराट आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.

राजकीय समीकरणे आणि अनपेक्षित निकाल :
गोंधळ शांत झाल्यानंतर नगराध्यक्षा संगीता महाजन यांच्या उपस्थितीत आणि मुख्याधिकारी अविनाश गांगुर्डे यांच्या देखरेखीखाली निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. राष्ट्रवादीकडून (अजित पवार गट) आसिफ मोहम्मद तर भाजपकडून राजेंद्र पंढरीनाथ चौधरी रिंगणात होते. भाजपने आपल्या विजयाचा पूर्ण विश्वास व्यक्त केला होता, मात्र ऐनवेळी काँग्रेसच्या दोन आणि शरद पवार गटाच्या एका नगरसेवकाने आपली भूमिका बदलून आसिफ मोहम्मद यांना पाठिंबा दिला. या ‘बंडखोरी’मुळे भाजपच्या हातातील सत्ता निसटली.
मतदानाचे संख्याबळ भाजपसाठी ठरले अपुरे
नगराध्यक्षा संगीता महाजन, राजेंद्र चौधरी, अरुण अस्वार, राजेश शिंदे, योगिता महाजन, सपना महाजन, अर्चना पाटील, सीमा जमादार तसेच अपक्ष नितीन महाजन व प्रमिला पाटील यांनी मतदान केले. मात्र, ही संख्या विजयासाठी अपुरी ठरली. दुसरीकडे, आसिफ मोहम्मद यांना राष्ट्रवादीच्या दारा मोहम्मद, सानिया साउथ, मोहम्मद समी, रुबीना बी. शेख, शेख सादिक, गोपाळ बिरपन, सालेहा कौसर, नरेंद्र उर्फ पिंटू वाघ यांच्यासह काँग्रेसच्या शाहीन खान, अनिता तायडे आणि शरद पवार गटाचे गणेश पाटील यांनी मतदान केले. या अनपेक्षित पाठिंब्यामुळे राष्ट्रवादीचा विजय सुकर झाला.
स्वीकृत नगरसेवक निवड :
उपनगराध्यक्ष निवडीसोबतच स्वीकृत नगरसेवकांची प्रक्रियाही पार पडली. यामध्ये पद्माकर महाजन, दिलीप हिरामण पाटील आणि राष्ट्रवादीकडून विनीत सूर्यकांत अग्रवाल यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड करण्यात आली. या संपूर्ण प्रक्रियेत झालेला राडा मात्र रावेर शहरात चर्चेचा विषय ठरला आहे.



