Home Cities जळगाव प्रभाग १३ मध्ये महायुतीच्या रॅलीला महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रभाग १३ मध्ये महायुतीच्या रॅलीला महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग १३ मध्ये आज राजकीय शक्तीप्रदर्शनाचा एक वेगळाच उत्साह पाहायला मिळाला. महायुतीच्या उमेदवारांनी काढलेल्या भव्य रॅलीला मतदारांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता, या प्रभागात महायुतीचे वर्चस्व अधिक घट्ट झाल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे, आमदार राजूमामा भोळे आणि माजी मंत्री गुलाबराव देवकर हे दोन्ही दिग्गज नेते या रॅलीत खांद्याला खांदा लावून सहभागी झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला होता.

गणपती बाप्पाच्या चरणी नतमस्तक :
रविवारी ११ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता प्रचाराच्या दुसऱ्या सत्राला सुरुवात झाली. गणपती नगर येथील श्री गणपती मंदिरात महायुतीच्या सर्व नेत्यांनी आणि उमेदवारांनी बाप्पाचे दर्शन घेऊन विजयाचा संकल्प केला. त्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात रॅलीला प्रारंभ झाला.

प्रभागाच्या कोपरान कोपऱ्यात संवाद :
ही प्रचार रॅली डी-मार्ट परिसर, नयनतारा गेस्ट हाऊस, लाईन्स हॉल, स्वामी समर्थ केंद्र यांसह नेहरू नगर आणि गुरुकृपा डेअरी परिसरातून काढण्यात आली. रॅलीचा समारोप छत्रपती संभाजी नगर चौकात करण्यात आला. या संपूर्ण मार्गावर ठिकठिकाणी महिलांनी उमेदवारांचे औक्षण करून स्वागत केले. उमेदवार नितीन सपके, सुरेखा नितीन तायडे आणि प्रफुल्ल गुलाबराव देवकर यांनी घरोघरी जाऊन ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद घेतले. प्रभाग १३ मधून वैशाली अमित पाटील यांची आधीच बिनविरोध निवड झाल्याने, आता उर्वरित तीनही जागांवर महायुतीचाच विजय निश्चित असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

विकासासाठी महायुतीला साथ द्या! :
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार राजूमामा भोळे आणि माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी सांगितले की, “प्रभागाचा सर्वांगीण विकास, अत्याधुनिक पायाभूत सुविधा आणि सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना निवडून देणे गरजेचे आहे.” एकाच व्यासपीठावर आलेल्या या दोन नेत्यांच्या ऐक्यामुळे प्रभाग १३ मधील राजकीय समीकरणे महायुतीच्या बाजूने झुकल्याचे पाहायला मिळत आहे.


Protected Content

Play sound