
मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून मुंबईकरांसाठी महत्त्वाकांक्षी वचननामा जाहीर करण्यात आला असून, सर्वसामान्य नागरिकांपासून महिला, युवक, कामगार आणि उद्योजकांपर्यंत प्रत्येक घटकाला दिलासा देणाऱ्या घोषणांचा समावेश करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत हा वचननामा प्रसिद्ध करण्यात आला असून, तब्बल दोन लाख नागरिकांच्या सूचना आणि अपेक्षा लक्षात घेऊन तो तयार करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

या वचननाम्यात झोपडपट्टीमुक्त मुंबई, २० ते ३५ लाख घरांची निर्मिती, बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय विद्यापीठाची स्थापना, पुढील पाच वर्षांसाठी पाणीपट्टी वाढीला स्थगिती, धारावीचा विकास डीआरपीमार्फत करणे आणि ३५० चौरस फुटांपर्यंतची घरे धारावीतच देण्याची हमी अशा अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. तसेच लाडक्या बहिणींना बेस्ट बस प्रवासात ५० टक्के सवलत देण्याची घोषणाही यावेळी करण्यात आली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीचा हा वचननामा मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनात प्रत्यक्ष बदल घडवणारा ठरेल. १५ जानेवारीला मतदान होणार असून १६ जानेवारीला महायुतीचा भगवा महापालिकेवर फडकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुंबईत आलेल्या मराठी माणसाचे रक्षण करणे, संस्कृती जतन करणे आणि मुंबईचा सर्वांगीण विकास करणे हेच आमचे ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
एकनाथ शिंदे यांनी पुढे सांगितले की, मुंबई पागडीमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, ओसीअभावी दुप्पट पाणीपट्टी आकारली जाण्याची प्रथा बंद करण्यात आली आहे. झोपडपट्टीमुक्त मुंबई हे शिवसेना प्रमुखांचे स्वप्न असून ते पूर्ण करण्यासाठी महायुती कटिबद्ध आहे. रमाबाई आंबेडकर नगरमध्ये एसआरए आणि एमएमआरडीमार्फत काम सुरू असून, गेली २० वर्षे भाडे न मिळालेल्या नागरिकांसाठी १५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गिरणी कामगारांना घरे देण्याचे कामही पूर्ण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
लाडक्या बहिणींना बेस्ट बस भाड्यात ५० टक्के सवलत देण्याबरोबरच २० ते ३५ लाख घरांची निर्मिती, लाखो तरुणांना रोजगार, लघु उद्योजकांना पाच लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज, पुनर्विकासात कोणतेही अडथळे येऊ नयेत यासाठी विशेष व्यवस्था आणि पाच वर्षांसाठी पाणीपट्टी वाढीला स्थगिती देण्याची ठाम ग्वाही एकनाथ शिंदे यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, महायुतीचा वचननामा हा केवळ आश्वासनांचा नसून कामाच्या ट्रॅक रेकॉर्डवर आधारित आहे. पुढील पाच वर्षांत काय-काय कामे केली याचा सविस्तर अहवाल जनतेसमोर मांडण्यात येईल. मुंबईकरांना मुंबईबाहेर जावे लागू नये, यासाठी मोठ्या प्रमाणात गृहनिर्माण प्रकल्प राबवले जात असल्याचे त्यांनी सांगितले. बीडीडी, अभ्युदय नगर आणि विशाल सह्याद्री नगर ही त्याची ठळक उदाहरणे असल्याचेही त्यांनी नमूद केले.
देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, धारावीचा विकास डीआरपीमार्फत केला जाईल आणि ३५० चौरस फुटांपर्यंतची घरे धारावीतच दिली जातील. पुनर्विकास म्हाडामार्फत होणार असून विकासकांवर कडक देखरेख ठेवली जाईल. महानगरपालिकेतील सफाई कामगारांना हक्काची घरे दिली जातील आणि महापालिका शाळा अधिक कौशल्ययुक्त बनवून मराठी भाषा लॅब सुरू केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
या वचननाम्यात मुंबईच्या पाणीपुरवठ्यासाठी गारगाई, पिंजाळ आणि दमणगंगा प्रकल्प पूर्ण करणे, पर्यावरण संवर्धनासाठी १७ हजार कोटींची तरतूद, बीएमसी मार्केटमध्ये मासळी विक्रेत्यांसाठी कोल्ड स्टोरेज, भाजी मंडईंचे नुतनीकरण, फिश इम्पोर्ट-एक्सपोर्ट सेंटर, लघु उद्योग धोरण, बेस्टमध्ये २०२९ पर्यंत पूर्णपणे इलेक्ट्रिक बसेस, बसेसची संख्या ५ हजारांवरून १० हजारांपर्यंत वाढवणे, स्टार्टअप इनक्युबेशन सेंटर, मराठी कला केंद्र, पर्यटन विभाग, हुतात्मा स्मारक चौकात जागतिक दर्जाचे संग्रहालय आणि विकसित मुंबईसाठी २०३४ चा आराखडा यांसारख्या अनेक महत्त्वाच्या घोषणांचा समावेश आहे.



