Home Cities जळगाव प्रभाग ४ मध्ये पियुष कोल्हे यांच्या प्रचारासाठी भव्य रॅली ; आमदार राजू...

प्रभाग ४ मध्ये पियुष कोल्हे यांच्या प्रचारासाठी भव्य रॅली ; आमदार राजू मामा भोळेंची उपस्थिती


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील प्रभाग क्रमांक चारमध्ये महायुतीचे उमेदवार पियुष ललित कोल्हे यांच्या प्रचारासाठी आज भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीला आमदार राजू मामा भोळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली असून, धार्मिक व पारंपरिक वातावरणात प्रचाराला सुरुवात करण्यात आली.

रॅलीपूर्वी आमदार राजू मामा भोळे यांनी जळगाव शहराचे ग्रामदैवत प्रभू श्रीरामचंद्र यांच्या मंदिरात विधिवत दर्शन घेतले. यावेळी नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी प्रभाग क्रमांक चारचे उमेदवार पियुष कोल्हे, महायुतीचे अन्य उमेदवार तसेच मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

श्रीराम मंदिरापासून निघालेली ही भव्य रॅली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर, जुने गावातील विठ्ठल मंदिर, बदाम गल्ली, १५ बोर्ड चौक, जोशी पेठ, भावसार मढी, रोज रथ चौक, सराफ बाजार आदी प्रमुख परिसरातून मार्गक्रमण करत पुढे गेली. रॅलीदरम्यान परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

ठिकठिकाणी मतदारांनी आमदार राजू मामा भोळे व उमेदवार पियुष कोल्हे यांचे औक्षण करून स्वागत केले. फुलांची उधळण, फटाक्यांची आतषबाजी आणि जल्लोषात करण्यात आलेल्या स्वागतामुळे संपूर्ण रॅली मार्गावर जल्लोष पाहायला मिळाला. कार्यकर्त्यांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.


Protected Content

Play sound