
जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून, शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. प्रभाग क्रमांक ११ मध्ये महायुतीच्या उमेदवारांनी आज ‘सुपर संडे’ साधत आपला प्रचाराचा वेग प्रचंड वाढवला आहे. रविवारी सकाळी रामानंद नगर परिसरात काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला.

आज सकाळी १० वाजता रामानंद नगर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात उमेदवारांनी मनोभावे दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात केली. ढोल-ताशांच्या गजरात आणि विजयाच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. यावेळी महायुतीच्या उमेदवार डॉ. अमृता चंद्रकांत सोनवणे, सिंधुताई कोल्हे, ललित कोल्हे आणि संतोष पाटील यांनी एकत्र येत मतदारांशी संवाद साधला.
डॉ. अमृता सोनवणेंचा दांडगा उत्साह :
प्रभाग ११ ‘अ’ मधील शिवसेनेच्या उमेदवार डॉ. अमृता सोनवणे यांनी या रॅलीत विशेष लक्ष वेधून घेतले. त्यांचा उत्साह आणि जनसंपर्क पाहून उपस्थित कार्यकर्त्यांचीही दमछाक होताना दिसली. घरोघरी जाऊन महिलांशी संवाद साधण्यावर त्यांनी भर दिला. यावेळी अनेक ठिकाणी महिलांनी या उमेदवारांचे औक्षण करून आणि अक्षता लावून विजयाचा आशीर्वाद दिला. “आम्हाला एकदा सेवा करण्याची संधी द्या, प्रभागाचा चेहरामोहरा बदलून टाकू,” असे आवाहन डॉ. सोनवणे यांनी यावेळी केले.
मतदारांच्या गाठीभेटीवर भर :
ही प्रचार रॅली रामानंद नगर, नेहरू नगर, जीवन नगर, शास्त्री नगर, अंबिका सोसायटी, मुंदडा नगर आणि कोल्हे नगर या भागातून काढण्यात आली. महायुतीच्या या चारही उमेदवारांनी प्रत्येक गल्लीत जाऊन ज्येष्ठ नागरिकांचे पाय धरून आशीर्वाद घेतले. नागरी समस्या सोडवण्याचे आणि विकासाची गंगा प्रभागात आणण्याचे आश्वासन यावेळी उमेदवारांनी दिले. निवडणुकीचे अवघे काही दिवस शिल्लक असल्याने उमेदवारांनी आता वैयक्तिक गाठीभेटीवर भर दिला आहे. महायुतीच्या या भव्य रॅलीमुळे प्रभाग ११ मधील राजकीय समीकरणे बदलणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.



