Home क्रीडा राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत यावलच्या खेळाडूंचा दबदबा

राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत यावलच्या खेळाडूंचा दबदबा


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभागाअंतर्गत येणाऱ्या यावल प्रकल्पातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळांच्या विद्यार्थ्यांनी अमरावती (विदर्भ) येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत राज्यभरात यावलचे नाव उज्वल केले आहे. कठोर परिश्रम, शिस्तबद्ध सराव आणि प्रभावी मार्गदर्शनाच्या बळावर या खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारांत विजयाचा डंका वाजवला आहे.

या राज्यस्तरीय स्पर्धेत यावल प्रकल्पाकडून सहभागी झालेल्या एकूण ५० खेळाडूंंपैकी तब्बल ४९ खेळाडूंनी पदके व पारितोषिके मिळवत घवघवीत यश संपादन केले. वैयक्तिक क्रीडा प्रकारांत यावल प्रकल्पाने सर्वाधिक २२ पदके पटकावली असून, सांघिक क्रीडा प्रकारांत ४ ट्रॉफी मिळवत आपली वर्चस्वाची छाप पाडली आहे. नाशिक विभागाला मिळालेल्या एकूण ५२४ गुणांपैकी यावल प्रकल्पाने सर्वाधिक ११८ गुणांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली आहे.

हे यश आदिवासी विकास विभाग, नाशिकचे अपर आयुक्त दिनकर पावरा, यावल प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली साध्य झाले आहे. तसेच सहाय्यक प्रकल्प अधिकारी पवन पाटील व संदीप पाटील यांच्या देखरेखीखाली यावल प्रकल्पातील क्रीडा शिक्षकांनी राज्यस्तरावर निवड झालेल्या खेळाडूंचा परिपूर्ण आणि शास्त्रशुद्ध सराव करून घेतल्यामुळे ही नेत्रदीपक कामगिरी शक्य झाली.

स्पर्धेतील ठळक यशामध्ये १४ वर्षांखालील मुलांचा खो-खो संघ राज्यस्तरावर अजिंक्य ठरला, तर १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने ४ बाय १०० मीटर रिले प्रकारात राज्यातून प्रथम क्रमांक पटकावला. याशिवाय १००, २००, ४००, ८०० मीटर धावणे, ५००० मीटर चालणे, लांब उडी, उंच उडी, थाळी फेक आणि भाला फेक अशा विविध वैयक्तिक क्रीडा प्रकारांतही यावल प्रकल्पाने राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळवला आहे.

१७ व १९ वर्षांखालील मुलांच्या संघाने ४ बाय ४०० मीटर रिले प्रकारात राज्यातून द्वितीय क्रमांक पटकावत आणखी एक यशाची नोंद केली. उत्कृष्ट कामगिरीबद्दल यावल प्रकल्पातील पिंगलाल दयाराम पावरा या खेळाडूला उत्कृष्ट धावपटू म्हणून गौरवण्यात आले असून, आदिवासी विकास विभाग अमरावतीच्या अपर आयुक्त आयुषी सिंग यांच्या हस्ते त्यांना सायकल बक्षीस म्हणून प्रदान करण्यात आली.


Protected Content

Play sound