सावदा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।सावदा नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर आता नव्या कारभाराची अधिकृत सुरुवात होणार असून, नगरपरिषदेची पहिली सर्वसाधारण सभा मंगळवार, १३ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आली आहे. या सभेत उपाध्यक्ष निवड आणि दोन नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती होणार असल्याने शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
सावदा नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया २१ डिसेंबर २०२५ रोजी यशस्वीरीत्या पूर्ण झाली असून, नवनिर्वाचित नगराध्यक्षा तसेच सर्व नगरसेवकांची नावे महाराष्ट्र शासनाच्या असाधारण राजपत्रात २२ डिसेंबर २०२५ रोजी अधिकृतरीत्या प्रसिद्ध करण्यात आली आहेत. या अधिसूचनेनंतर आता कायदेशीर व प्रशासकीय प्रक्रियेनुसार पहिली सर्वसाधारण सभा घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ तसेच संबंधित नियम व शासन परिपत्रकांनुसार ही सर्वसाधारण सभा सकाळी ११ वाजता नगरपालिका सावदा येथील सभागृहात होणार आहे. या सभेचे विशेष महत्त्व असून, नव्या नगरपरिषदेच्या कार्यकाळातील पहिल्याच बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत.
या ऐतिहासिक सभेत सर्वप्रथम नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात येणार आहे. त्यानंतर त्याच सभेत दोन नामनिर्देशित (स्वीकृत) सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाच्या शासन परिपत्रकानुसार या सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ. रेणुका राजेंद्र पाटील या पीठासीन अधिकारी म्हणून कामकाज पाहणार आहेत.
सावदा नगरपरिषदेतील सध्याचे पक्षीय बलाबल लक्षवेधी ठरत आहे. भारतीय जनता पार्टी व शिवसेना युतीचे प्रत्येकी पाच सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट) चे सात सदस्य, तसेच तीन अपक्ष सदस्य असे एकूण बलाबल असल्याने उपनगराध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार, याबाबत शहरात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
यासोबतच कोणत्या व्यक्तींना नामनिर्देशित सदस्य म्हणून संधी मिळणार, याबाबतही नागरिकांमध्ये उत्सुकता आहे. राजकीय अनुभव, सामाजिक कार्य आणि प्रशासनातील योगदान या निकषांवर निवड होणार असल्याची चर्चा असून, विविध नावांची जोरदार चर्चा सुरू आहे.
एकूणच १३ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता होणारी ही पहिली सर्वसाधारण सभा सावदा नगरपरिषदेच्या पुढील वाटचालीस दिशा देणारी ठरणार आहे. या सभेतून होणारे निर्णय शहराच्या विकासाच्या दृष्टीने निर्णायक ठरतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



