खामगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । समाजात स्त्री-पुरुष समानतेबाबत जनजागृती घडवून आणण्यासाठी खामगाव शहरात एक प्रभावी आणि प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात आला. गो.से. कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या महिला सक्षमीकरण व उद्योजकता समितीच्या वतीने आयोजित ‘जागर स्त्री-पुरुष समानतेचा सप्ताह’ अंतर्गत विद्यार्थ्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून स्त्री शक्तीचा जागर केला.

या उपक्रमांतर्गत विद्यार्थी-विद्यार्थिनींनी खामगाव बस स्टँड, रेल्वे स्टेशन तसेच फारशी भाग या वर्दळीच्या ठिकाणी ‘जागर स्त्री शक्तीचा’ हे प्रभावी पथनाट्य सादर केले. दैनंदिन जीवनातील घटनांवर आधारित सादरीकरणातून स्त्रीवर होणारे अन्याय, समाजातील भेदभाव आणि त्याविरुद्ध उभे राहणारी स्त्री शक्ती यांचे प्रभावी चित्रण करण्यात आले. पथनाट्याने उपस्थित नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.

विद्यार्थ्यांच्या सशक्त संवादशैलीने आणि प्रभावी अभिनयाने स्त्री शक्तीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. शिक्षण, स्वावलंबन, आत्मसन्मान आणि समान संधी यांचा संदेश या पथनाट्यातून ठळकपणे मांडण्यात आला. या उपक्रमामुळे समाजातील प्रत्येक घटकाने स्त्री-पुरुष समानतेचा स्वीकार करावा, असा सकारात्मक संदेश देण्यात आला.
खामगाव शहरातील नागरिकांनी या अभिनव उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. अनेक नागरिकांनी थांबून पथनाट्य पाहिले आणि सामाजिक विषयावर प्रभावीपणे मांडणी केल्याबद्दल आयोजकांचे अभिनंदन केले. या उपक्रमामुळे सामाजिक जाणीव जागृत होण्यास मोठी मदत झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.



