जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत गुरुवारी महायुतीने काढलेल्या भव्य ‘रोड शो’मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली होती. मात्र, रोड शोच्या सांगता समारंभात उपमुख्यमंत्र्यांनी थेट फोनवरून उपस्थित जनसमुदायाशी संवाद साधत विरोधकांना सडेतोड उत्तर दिले आणि कार्यकर्त्यांमध्ये विजयाचा नवा जोश भरला.

“गुलाल उधळायला मी स्वतः येणार” :
काही अपरिहार्य शासकीय कारणांमुळे उपमुख्यमंत्र्यांना या रोड शोसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहता आले नाही. मात्र, त्यांनी फोनवरून जळगावकरांशी संवाद साधला. “काही कारणास्तव मला आजच्या या ऐतिहासिक रोड शोसाठी येणे जमले नाही, याचे मला नक्कीच वाईट वाटतेय. पण मला खात्री आहे की जळगाव महापालिकेवर महायुतीचाच भगवा फडकणार आहे. निवडणुकीच्या निकालानंतर विजयाचा गुलाल उधळण्यासाठी हा एकनाथ शिंदे जळगावला आल्याशिवाय राहणार नाही,” अशा शब्दांत त्यांनी आपला निर्धार व्यक्त केला.

महायुतीच्या विजयाचा ठाम विश्वास :
उपमुख्यमंत्री पुढे म्हणाले की, “जळगावात जमलेला हा जनसागर सांगतोय की जनतेचा कल कोणाकडे आहे. आम्ही राज्याचा जो विकास केला आहे, त्याला जळगावची जनता नक्कीच पाठिंबा देईल. महायुतीचे सर्व उमेदवार सक्षम असून, जळगावचा चेहरामोहरा बदलण्यासाठी ते सज्ज आहेत.” उपमुख्यमंत्र्यांचा आवाज लाऊडस्पीकरवर ऐकताच उपस्थित कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी करत परिसर दुमदुमून टाकला.
नेत्यांकडून स्वागत :
यावेळी व्यासपीठावर उपस्थित उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि इतर मान्यवरांनी एकनाथ शिंदे यांच्या संदेशाचे स्वागत केले. “उपमुख्यमंत्री स्वतः आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, हीच आमची मोठी ताकद आहे,” अशा भावना यावेळी नेत्यांनी व्यक्त केल्या. एकनाथ शिंदेच्या या थेट संवादामुळे जळगाव मनपा निवडणुकीच्या प्रचारात महायुतीला मोठे भावनिक बळ मिळाले असून, विरोधकांसमोर पेच निर्माण झाला आहे.



