
फैजपूर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । फैजपूर येथे सुरू असलेल्या सामुदायिक तुलसी अर्चन, विठ्ठल नामजप, श्री संगीत रामायण कथा आणि भव्य नामसंकीर्तन महोत्सवाने संपूर्ण परिसर भक्तिरसाने भारावून गेला आहे. या पावन उत्सवात केवळ अध्यात्मिक आनंदच नव्हे तर समाजोपयोगी सेवाभाव आणि दानधर्म यांचा सुरेख संगम पाहायला मिळत असून, वारकरी परंपरेतील सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडत आहे.

आजच्या कीर्तनप्रसंगी ह. भ. प. श्री अनिल महाराज पाटील (श्री क्षेत्र बार्शी) यांच्या सुमधुर, ओजस्वी आणि प्रभावी कीर्तनाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. विठ्ठल नामाच्या गजरात वातावरण भक्तीमय झाले असून, कीर्तनातून भक्तीबरोबरच सेवा व त्यागाचे महत्त्व प्रभावीपणे अधोरेखित करण्यात आले.
या कीर्तनादरम्यान वारकरी शिक्षण संस्था, श्री क्षेत्र आळंदी (पुणे) येथील अन्नछत्र सेवेसाठी उल्लेखनीय देणगी जाहीर करण्यात आली. कै. कमल गोविंद सराफ यांच्या पवित्र स्मरणार्थ निलेश (पिंटू भाऊ) राणे यांनी ₹१,०१,१११ रुपयांची उदार देणगी अर्पण करत सेवाभावाचा आदर्श निर्माण केला. या योगदानामुळे उपस्थित भाविकांमध्येही दानाची प्रेरणा निर्माण झाली.
भक्तीपूर्ण वातावरणात सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांच्या अन्नदान सेवेसाठी अनेक भाविकांनी उत्स्फूर्तपणे मदतीची घोषणा केली. यावल आणि रावेर तालुक्यातील भाविकांच्या वतीने या अन्नदान उपक्रमासाठी सुमारे ₹५ लाख ५१ हजार रुपयांचा निधी जमा करून देण्यात येणार असल्याची माहिती महोत्सव समितीचे निमंत्रक नरेंद्र नारखेडे यांनी दिली. या घोषणेमुळे महोत्सवातील सेवाभाव अधिकच दृढ झाला.
या सेवाभावी उपक्रमात नरेंद्र पितांबर चौधरी, सी. के. चौधरी, गणेश जनार्दन भारंबे, सिद्धेश्वर वाघूळदे (भागवत वारकरी), सुनीता भरत चौधरी, हेमंत तुकाराम पाटील, निलेश उर्फ पिंटू राणे तसेच आशाबाई वासुदेव महाजन यांचे मोलाचे योगदान लाभले. सर्व दानशूर भाविकांचे महोत्सव समितीच्या वतीने विशेष आभार व्यक्त करण्यात आले.
या उपक्रमामुळे वारकरी संप्रदायातील भक्ती, दान आणि सेवा या त्रिसूत्रीचा अत्यंत सुंदर संगम अनुभवायला मिळाला. समाजातील दानशूर वृत्ती, वारकरी परंपरेप्रती असलेली निष्ठा आणि सामाजिक बांधिलकी यांचे हे प्रेरणादायी उदाहरण ठरले असून, उपस्थित भाविकांनी या सेवाभावाचे मनःपूर्वक कौतुक केले.



