अमरावती-वृत्तसेवा । महाराष्ट्रातील महिलांसाठी आर्थिक आधार ठरलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याच्या चर्चांना आता स्पष्ट पूर्णविराम मिळाला आहे. या योजनेवरून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमरावतीतील प्रचारसभेत आक्रमक भूमिका घेत लाडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही, अशी ग्वाही दिली आहे.
राज्यातील वार्षिक अडीच लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा १,५०० रुपये जमा केले जातात. आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी ही योजना मोठा दिलासा ठरली असून अल्पावधीतच तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. विधानसभा निवडणुकीत या योजनेचा महायुतीला मोठा राजकीय लाभ झाल्याचेही राजकीय विश्लेषकांकडून सांगितले जात आहे.

निवडणूक प्रचारादरम्यान महायुतीतील काही नेत्यांनी लाडकी बहीण योजनेतील सन्मान निधी १,५०० रुपयांवरून वाढवून २,१०० रुपये करण्याची घोषणा केली होती. मात्र राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होऊन जवळपास एक वर्ष उलटूनही निधीवाढीबाबत अद्याप कोणताही अधिकृत निर्णय झालेला नसल्याने लाभार्थी महिलांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, या योजनेत अपात्र महिलांचाही समावेश झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर सरकारने कठोर पावले उचलली. पात्रतेच्या निकषांमध्ये न बसणाऱ्या महिलांची नावे योजनेतून वगळण्यात आली. तसेच अपात्र लाभार्थ्यांना आळा घालण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली. ई-केवायसी पूर्ण केलेल्या महिलांनाच पुढे या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. या प्रक्रियेमुळे मोठ्या प्रमाणात लाभार्थी महिलांची संख्या कमी झाल्याने विरोधकांनी ही योजना हळूहळू बंद पडणार असल्याचा आरोप केला होता, ज्यामुळे अनेक लाभार्थी महिलांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.



