भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ येथील मुख्य शाखेत सेंट्रल रेल्वे मजदूर संघाची मंडळस्तरीय महत्वपूर्ण परिषद मोठ्या उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडली. संघाचे अध्यक्ष तसेच संयुक्त महामंत्री (एनएफआयआर) आणि राष्ट्रीय सचिव (आयएनटीयूसी) डॉ. प्रवीण बाजपेयी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिषदेने रेल्वे कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडली.

परिषदेत मार्गदर्शन करताना डॉ. प्रवीण बाजपेयी यांनी मध्य रेल्वेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय अडचणी, कामाच्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या समस्या आणि सेवासंबंधी प्रश्न सोडवणे हे संघटनेचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे स्पष्ट केले. यापुढेही विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना वेळोवेळी निवेदने सादर करून कर्मचाऱ्यांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी संघटना कटिबद्ध राहील, अशी ठाम ग्वाही त्यांनी दिली. ही मंडळस्तरीय परिषद वर्षातून चार वेळा आयोजित केली जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.

झोनल रेल्वे ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (झेआरटीआय) येथील अन्नपूर्णा खानावळीत दूषित अन्नामुळे सुमारे १५० प्रशिक्षणार्थी अधिकारी व कर्मचाऱ्यांना विषबाधा झाल्याच्या दुर्दैवी घटनेचा उल्लेख करताना डॉ. बाजपेयी यांनी खानावळ पर्यवेक्षण समितीच्या निष्काळजी कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. या घटनेनंतर संघटनेने तातडीने आवाज उठवला होता आणि भविष्यातही कर्मचाऱ्यांच्या आरोग्याशी संबंधित कोणत्याही निष्काळजीपणाविरोधात संघटना सातत्याने संघर्ष करेल, असा इशाराही त्यांनी दिला.
ड्यूटीदरम्यान दुर्दैवाने मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना संघटनेच्या वतीने एक लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जात असल्याची माहिती देत त्यांनी संघटनेची सामाजिक बांधिलकी अधोरेखित केली. तसेच रेल्वे कर्मचाऱ्यांच्या क्रेडिट सोसायटीबाबत बोलताना सध्या संघटनेची सत्ता नसली तरी लवकरच ती प्राप्त होईल आणि त्यानंतर कर्ज वितरण प्रक्रिया पूर्णतः ऑनलाइन केली जाईल, जेणेकरून कर्मचाऱ्यांना जलद, पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने कर्ज उपलब्ध होईल, असा विश्वास व्यक्त केला.
झेआरटीआय येथील विषबाधा प्रकरणासह पावसाळी ग्राउंड ट्रान्सफर, कर्मचाऱ्यांना वेळेवर रिलीव्ह देणे यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर डॉ. बाजपेयी यांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांशी यशस्वी चर्चा केल्याची माहितीही परिषदेत देण्यात आली.
या परिषदेला मुख्यालय उपाध्यक्ष व्ही. के. समाधीया, मंडळ अध्यक्ष मोहम्मद इरफान, मंडळ सचिव एस. बी. पाटील, शाखा अध्यक्ष भूपेंद्र निळकंठ, शाखा सचिव महिंद्र सपकाळे, भुसावळ झोनल कारखाना सचिव तथा ईसीसी डेलिगेट किशोरभाऊ कोलते, पीओएच सचिव अजित अमोदकर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने रेल्वे कर्मचारी उपस्थित होते.



