मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मराठी मनोरंजनविश्वात प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा केंद्रबिंदू ठरलेला आणि संपूर्ण महाराष्ट्र ज्या शोची आतुरतेने वाट पाहतो, तो लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस मराठी’ पुन्हा एकदा नव्या पर्वासह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘बिग बॉस मराठी’ सिझन 6 चे भव्य आणि दणक्यात पुनरागमन होत असून, यंदाही मराठी प्रेक्षकांचा लाडका ‘भाऊ’ रितेश देशमुख या शोचं सूत्रसंचालन करताना दिसणार आहे.

नव्या पर्वात बिग बॉसचं घर पूर्णपणे नव्या रूपात सज्ज करण्यात आलं आहे. घराची रचना, नियम आणि खेळाची पद्धत यंदा अधिक वेगळी आणि आव्हानात्मक असणार आहे. “दार उघडणार… नशिबाचा गेम पालटणार!” या थरारक थीमवर आधारित घरात प्रत्येक दारामागे एखादा मोठा ट्विस्ट, धक्का किंवा आयुष्य बदलणारा क्षण लपलेला असेल, अशी माहिती समोर आली आहे.

यंदाचा सिझन तब्बल 100 दिवस चालणार असून, 100 हून अधिक कॅमेऱ्यांच्या नजरकैदेत स्पर्धकांचा प्रत्येक क्षण टिपला जाणार आहे. या दीर्घ प्रवासात प्रेक्षकांना अतरंगी स्वभाव, बदलती नाती, प्रेम, मैत्री, मतभेद, वादविवाद आणि प्रचंड चुरशीचा खेळ पाहायला मिळणार आहे. प्रत्येक आठवडा नव्या वळणाने आणि अनपेक्षित घटनांनी भरलेला असणार असल्याने शोबद्दलची उत्सुकता अधिकच वाढली आहे.
सूत्रसंचालनाची जबाबदारी पुन्हा एकदा रितेश देशमुख यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. मागील सिझनमध्ये आपल्या स्पष्ट मतांमुळे, रोखठोक शैलीमुळे आणि प्रेमळ स्वभावामुळे त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली होती. कधी मित्र, कधी मार्गदर्शक, तर कधी कठोर भूमिका घेत त्यांनी घरातील सदस्यांना आरसा दाखवला होता आणि हेच रूप यंदाही पाहायला मिळणार आहे.
रितेश देशमुख म्हणाला की, “‘बिग बॉस मराठी’चं घर म्हणजे रोज नवं आव्हान आणि नवं वळण. पुन्हा एकदा या शोचं सूत्रसंचालन करण्याची संधी मिळणं माझ्यासाठी खास आहे. यंदा कुठलं दार कुणाचं नशीब उघडेल हे कुणालाच माहीत नाही. या सिझनमध्ये राडा, भावना, मस्ती आणि धक्के सगळं काही प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.”
या सिझनमध्ये 13,000 चौरस फूट क्षेत्रफळाच्या भव्य घरात विविध क्षेत्रातील 16 हून अधिक लोकप्रिय व्यक्तिमत्त्वे सहभागी होणार आहेत. प्रत्येक आठवड्यात किमान एका स्पर्धकाचं नामांकन होईल आणि शेवटपर्यंत टिकणारा एकच स्पर्धक ‘बिग बॉस मराठी’ सिझन 6 चा विजेता ठरणार आहे.
दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी सांगितले की, मराठी प्रेक्षक अतिशय चोखंदळ असल्यामुळे यंदा फक्त खेळच नाही, तर संपूर्ण अनुभव नव्याने घडवण्यावर भर देण्यात आला आहे. 21 ते 55 वयोगटातील विविध विचारसरणी, अनुभव आणि स्वभाव असलेले स्पर्धक यंदा बिग बॉसच्या घरात पाहायला मिळणार असल्याने घरातील वातावरण अधिक रंगतदार होणार आहे.
एकूणच, नव्या घराची रचना, थरारक थीम, 100 दिवसांचा खेळ आणि रितेश भाऊंचं दमदार सूत्रसंचालन यामुळे ‘बिग बॉस मराठी’ सिझन 6 प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी ठरणार आहे. 11 जानेवारीपासून सुरू होणारा हा प्रवास कोणाचं नशीब पालटतो, याकडे अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.



