अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आद्यपत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणाऱ्या पत्रकार दिनानिमित्त अमळनेर येथे उद्या मंगळवार, दिनांक ६ जानेवारी रोजी भव्य पत्रकार दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पत्रकारितेच्या मूल्यांची आठवण करून देणारा हा कार्यक्रम सकाळी १० वाजता पत्रकार भुवन (योगा भुवन), अन्नपूर्णा मंगल कार्यालयाजवळ, अमळनेर येथे होणार आहे.
अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघटना, व्हॉइस ऑफ मीडिया तसेच महाराष्ट्र पत्रकार संघटना यांच्यासह शहर व तालुक्यातील सर्व पत्रकार संघटनांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. पत्रकारितेच्या सामाजिक बांधिलकीचा सन्मान करणाऱ्या या कार्यक्रमासाठी व्यापक तयारी करण्यात आली असून, पत्रकार बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

या पत्रकार दिन सोहळ्यास तालुक्यातील लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. पत्रकारितेच्या कार्याचा गौरव, अनुभवांची देवाणघेवाण आणि समाजातील पत्रकारांच्या भूमिकेवर सकारात्मक संवाद साधण्याचा उद्देश या सोहळ्यामागे असल्याचे आयोजकांनी सांगितले.
पत्रकार दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमातून आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याचा आदर्श समोर ठेवत पत्रकारांनी निर्भीड, वस्तुनिष्ठ व समाजहिताची पत्रकारिता करावी, असा संदेश देण्यात येणार आहे. अमळनेर शहर व तालुक्यातील पत्रकारांनी एकत्र येऊन पत्रकारितेच्या मूल्यांचा सन्मान करावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने सर्व पत्रकार बांधवांनी या पत्रकार दिन सोहळ्यास आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. एकत्रित सहभागातून पत्रकारितेची ताकद आणि एकजूट दाखवण्याची ही योग्य संधी असल्याचे आयोजकांनी नमूद केले आहे.



