बुलढाणा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा। देशात वाघांची संख्या घटत असल्याने व्याघ्रदर्शन दुर्मिळ होत चालले असतानाच बुलढाण्यातील ज्ञानगंगा अभयारण्यातून दिलासादायक बातमी समोर आली आहे. तब्बल चार वर्षांनंतर या अभयारण्यात वाघाचे पुनरागमन झाले असून त्यामुळे वनविभागासह निसर्गप्रेमी आणि पर्यटकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ताडोबा, पेंचसारख्या अभयारण्यांप्रमाणेच ज्ञानगंगा अभयारण्यातही आता वाघाचे दर्शन घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. पेंच व्याघ्र प्रकल्पातून ३६ महिन्यांचा तरुण वाघ बुलढाण्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात दाखल झाला असून या आगमनामुळे येथील वन अधिकारी आणि कर्मचारी विशेष आनंद व्यक्त करत आहेत. चार वर्षांपूर्वी या अभयारण्यात अधिवासात असलेला T1C1 हा वाघ अचानक गायब झाल्यानंतर येथे वाघ नव्हता.

PKT7CP1 असे या नव्याने दाखल झालेल्या वाघाचे नाव असून सध्या त्याला ज्ञानगंगा अभयारण्यात तयार करण्यात आलेल्या संरक्षित व नियंत्रित अधिवासात ठेवण्यात आले आहे. या अधिवासात सुमारे दहा दिवस वाघाला निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार असून त्यानंतर त्याला थेट अभयारण्यात मुक्तपणे सोडण्यात येणार आहे. वाघ नवीन परिसराशी जुळवून घेण्यासाठी हा काळ महत्त्वाचा असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले.
या वाघाच्या आगमनामुळे ज्ञानगंगा अभयारण्यातील जैवविविधतेला चालना मिळणार असून पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. वाघाच्या उपस्थितीमुळे अभयारण्याची सुरक्षा अधिक बळकट होईल आणि वन्यजीव संरक्षणाच्या दृष्टीनेही हा महत्त्वाचा टप्पा ठरेल, असे अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश सावळे यांनी सांगितले.
दरम्यान, वाघ आल्याने संपूर्ण अभयारण्यात नवचैतन्य निर्माण झाले असून वन अधिकारी व कर्मचारी त्याच्या आरोग्याची आणि सुरक्षेची विशेष काळजी घेत आहेत. वाघाच्या हालचालींवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून पर्यटकांसाठी आवश्यक ती खबरदारीही घेतली जात आहे.
एकूणच, चार वर्षांनंतर ज्ञानगंगा अभयारण्यात वाघाचे पुनरागमन हे वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल ठरले असून, भविष्यात हे अभयारण्य पुन्हा एकदा व्याघ्रदर्शनासाठी ओळखले जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.



